
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईकरांना शुद्ध, स्वच्छ पाणी मिळावे म्हणून महानगरपालिकेने गेल्या काही वर्षांत केलेल्या उपाययोजनांचे आता चांगले परिणाम दिसू लागले आहेत. पाणी दूषित होण्याचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत कमालीचे घटले आहे. गेल्या वर्षभरात घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांपैकी सरासरी अवघा एक टक्का पाणी दूषित आढळून आले आहे. पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अहवालात प्रशासनाने हा दावा केला आहे.
कित्येक कि.मी. अंतरावरून शुद्धीकरण केलेले पाणी जलवाहिन्यांमधून मुंबईच्या घराघरात पोहोचवले जाते. मात्र या जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्यामुळे त्यातून पाणीगळती होण्याचे किंवा दूषित पाणी मिसळण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र पालिकेच्या जलअभियंता विभागाने गेल्या काही वर्षांत तयार केलेले जलबोगदे आणि जलवाहिन्या बदलण्याची हाती घेतलेली कामे यामुळे पाणी दूषित होण्याचे प्रमाण घटले आहे. पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वार्षिक अहवालात दिलेल्या आकडेवारीवरून हे सिद्ध झाले आहे. गेल्या तीन वर्षांत दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये कमालीची घट झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
मेट्रोमुळे दूषित पाणी
दूषित पाण्याची सर्वाधिक टक्केवारी उच्चभ्रूंच्या ए वॉर्डात आहे. या भागात मेट्रोचे काम सुरू असून अनेकदा जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच आर मध्य म्हणजेच बोरिवलीतही दूषित पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याखालोखाल जी उत्तरमध्ये असून तिथेही मेट्रोचे खोदकाम सुरू आहे.
दोन विभागांत १०० टक्के स्वच्छ पाणी
चोवीस वॉर्डांत रोज घेण्यात येणाऱ्या पाण्याच्या नमुन्यांपैकी बहुतांश वॉर्डांत दूषित पाण्याचे प्रमाण एक टक्का आहे. तर पी उत्तर (कांदिवली) आणि के पश्चिम (अंधेरी पश्चिम) या भागात हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी असल्याचे आढळून आले आहे.






























































