28 ऑक्टोबरपासून लोकल सेवा 100 टक्के क्षमतेने धावणार, SOP नुसार प्रवास करण्याची परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सणासुदीचा काळ सुरू असून शाळा-कॉलेजही सुरू झाले आहेत, यामुळे मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमध्ये गर्दी वाढत आहे. उपनगरीय ट्रेनमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन 28 ऑक्टोबर पासून, मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवा प्री-कोविड स्तरावर म्हणजेच मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात पूर्ण क्षमतेने (100 टक्के) चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षी 22 मार्च 2020 पासून कोविड-19 लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. नंतर 15 जून 2020 पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणींसाठी उपनगरीय सेवा सुरू केल्या. उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या प्रवाशांच्या श्रेणी, नंतर ऑगस्ट 2021 मध्ये आणि अलीकडच्या आठवड्यात वाढवण्यात आल्या.

सध्या, मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वे अनुक्रमे मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 1702 आणि 1304 उपनगरीय सेवा चालवत आहेत ज्या त्यांच्या एकूण उपनगरीय सेवांच्या 95.70 टक्के आहे. मात्र आता 28 ऑक्टोबर 2021 पासून, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात प्री-कोविड स्तरावर 100 टक्के उपनगरीय सेवा म्हणजेच मध्य रेल्वेवर 1774 आणि पश्चिम रेल्वेवर 1367 सेवा चालवतील. लोकलची सेवा वाढवण्यात आली असली तरी प्रवासाचे निकष बदलले नाहीत. राज्य सरकारने निवडलेल्या श्रेणी आणि त्यांनी जाहीर केलेल्या SOP नुसार प्रवास करण्याची परवानगी आहे, असे मध्य रेल्वेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रात स्पष्ट केले आहे.