सकाळपासूनच उन्हाचे तीव्र चटके, मुंबईच्या किमान तापमानात मोठी वाढ

सलग दोन महिने विक्रमी उकाडय़ाचा ‘ताप’ सहन केलेल्या मुंबईकरांना मे महिना भलताच त्रासदायक ठरणार आहे. पहिल्याच आठवडय़ात शहरातील किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी पुलाब्यातील किमान तापमानाचा पारा थेट 27 अंशांवर गेल्याने मुंबईकरांना सकाळपासूनच उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागले. पुढील आठवडाभर किमान तापमान चढेच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई शहरात सांताक्रूझ आणि पुलाबा या दोन्ही पेंद्रांवर शुक्रवारी किमान तापमानात मोठी वाढ झाली. सांताक्रूझमध्ये 25 अंश, तर पुलाब्यात 27 अंश इतके किमान तापमान नोंदवण्यात आले. गेल्या महिन्यात कमाल तापमानाने मुंबईकरांना प्रचंड घाम फोडला. त्यापाठोपाठ आता मे महिन्याच्या सुरुवातीला किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने सकाळपासून लाहीलाही होऊ लागली आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर मुंबईतील किमान तापमान 26 ते 27 अंशांच्या आसपास राहणार आहे. यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि जागतिक हवामानशास्त्र संघटनेने देशभरातील तापमानवाढ तीव्र होणार असल्याचा इशारा दिला आहे.

4 ते 6 मेदरम्यान गडगडाटासह पाऊस पडण्याचे भाकीत

मुंबईच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली असतानाच हवामान खात्याने पावसाच्या हजेरीचे भाकीत केले आहे. मुंबई शहर व उपनगरांत 4 ते 6 मे या तीन दिवसांत गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज पुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

अकोला सर्वाधिक 44.9, सोलापूरचा पारा 44.7 वर

पुणे 40.6, पुणे लोहगाव 43.2, सोलापूर 44.7, सातारा 40.9, सांगली 40, कोल्हापूर 39, मालेगाव 42.6, जळगाव 43.9, परभणी 44.1, धाराशिव 42.6, छत्रपती संभाजीनगर 42.2, बीड 42.8, अकोला 44.2, अमरावती 40.4, यवतमाळ 42.6, वाशिम 42.4.