
कार, दुचाकी यांसारख्या वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये ‘दादा’, ‘मामा’, ‘बाबा’, ‘भाई’, ‘डॉन’ असा उल्लेख करणाऱ्या वाहनचालकांवर मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) ‘रडार’ प्रणालीद्वारे कारवाईचा धडाका लावला आहे. आरटीओच्या ताफ्यात अलीकडेच अत्याधुनिक ‘रडार’ प्रणाली असलेली इंटरसेप्टर वाहने दाखल झाली आहेत. ही वाहने रस्त्यांवर उतरून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे चेहरे आणि गाडय़ांचे नंबर टिपत आहेत. त्याआधारे ‘चालान’ पाठवून वाहनचालकांना दंड ठोठावला जात आहे.
मुंबई शहरासह पूर्व व पश्चिम उपनगरांत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहनचालक दुचाकी, कारच्या नंबरप्लेटवर ‘दादा’, ‘मामा’, ‘बाबा’, ‘भाई’, ‘डॉन’, ‘दाजी’, ‘बॉस’, ‘ताई’ अशा स्वतःची वेगळी छाप दाखवण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक, गाडय़ांचा नंबर स्पष्ट दिसणे आवश्यक असते. संबंधित वाहनचालकांवर कारवाईसाठी आरटीओ कार्यालयांना ‘रडार’ प्रणालीची मोठी मदत मिळत आहे. त्या वाहनचालकांकडून एक हजार ते दोन हजारांपर्यंत दंड आकारला जात आहे.
कोस्टल रोड, सी लिंकवर ओव्हरस्पीडिंगची ‘नशा’
अपघातप्रवण क्षेत्र, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर ‘रडार’ प्रणालीच्या मदतीने कारवाई करण्यात येत आहे. कोस्टल रोड, हाजी अली, वांद्रे-वरळी सेतू अशा भागांत भरधाव वेगात गाडय़ा चालवणारे आरटीओच्या तडाख्यात सापडत आहेत. तसेच विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, हेल्मेट न घालणारे सहप्रवासी, कारमध्ये सीटबेल्ट न वापरणे, परवान्याची मुदत संपूनही गाडी चालवणे असे नियम उल्लंघनाचे गुन्हे मोठय़ा प्रमाणावर नोंद होत आहेत.
n परिवहन विभागाने ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली या चारही आरटीओ कार्यालयांना एक-दोन इंटरसेप्टर वाहने पुरवली आहेत. मागील 20 दिवसांत या वाहनांमुळे कारवाईला वेग मिळाला आहे. आरटीओ कार्यालयांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक नियम उल्लंघनाचे ताडदेवमध्ये 85, अंधेरीमध्ये 80 आणि बोरिवली आरटीओच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक 357 गुह्यांची नोंद झाली आहे. संबंधित वाहनचालकांना दंडवसुली करण्यात येत आहे. वडाळा कार्यालयाने ‘रडार’ यंत्रणेच्या सहाय्याने कारवाई अजून सुरू केलेली नाही.























































