सोन्याच्या बिस्किटाच्या नावाखाली केली फसवणूक

सोन्याची बिस्कीट खरेदीच्या नावाखाली जिम ट्रेनरची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पार्क साईट पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.

तक्रारदार हे जिम ट्रेनर आहेत. त्यांच्या एका मित्राने त्याला त्याच्या परिचित असलेला एकजण सोन्याची बिस्किटे विकणार असल्याचे सांगितले. ती बिस्किटे बाजारात सात लाख रुपयांना मिळतात. पण तो सहा लाखांत विक्री करणार असल्याचे भासवले. विश्वास बसावा म्हणून त्या बिस्किटाचा त्यांना एक व्हिडीओदेखील पाठवला. ते बिस्कीट कोणत्याही ज्वेलर्सला दाखवल्यास तो सात लाख रुपये देईल असे त्यांना सांगितले. त्यानुसार तक्रारदार याने पैशाची व्यवस्था केली.

दोन दिवसांपूर्वी तक्रारदार यांना विक्रोळी पूर्व परिसरात भेटण्यास सांगितले. त्यानंतर हेमंत नावाची व्यक्ती विक्रोळी येथे आली. रिक्षातून आलेल्या आणखी दोघा जणांनीही भूलथापा दिल्या आणि पैसे उकळले. मात्र त्यांची वागणूक संशयास्पद वाटल्याने जिम ट्रेनरने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.