मुंबई सौंदर्यीकरण करण्याच्या नावाखाली पालिकेने गेल्या दोन वर्षांत केलेल्या सर्वच कामांचा रंग उडाला असून तब्बल 953 कोटी पाण्यात गेले आहेत. सुंदर मुंबईच्या नावाखाली केलेल्या रंगकामाचा रंग उतरला असून लायटिंगच्या वायरी अनेक ठिकाणी धोकादायकरीत्या लटकत आहेत. रस्त्यांवर जागोजागी खड्डे तयार झाले असून वाहतूक बेटांवर केलेल्या सजावटीची दुरवस्था झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा कायापालट करण्यासाठी मुंबईचे सौंदर्यीकरण करा असे आदेश मुंबई महापालिकेला सप्टेंबर 2022 मध्ये दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाने सौंदर्यीकरणाचे काम घेत मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी 1700 कोटींची तरतूदही केली. मुंबईचे सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांसाठी मोकळ्या जागांची निर्मिती, वाहतूक बेटं, उद्याने, पदपथ, विद्युत स्तंभ, सुशोभित सार्वजनिक भिंती इत्यादी बाबींवर लक्ष पेंद्रित करून त्यांची सुधारणा, सुशोभीकरण यावर भर दिला आहे. मुंबईच्या सौंदर्यीकरण प्रकल्पअंतर्गत आजवर एकूण 1320 कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. पैकी 1236 कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे विभाग कार्यालयांमार्फत करण्यात आली आहेत.
सरकारने 1700 कोटी दिलेच नाहीत
– मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाने सौदर्यीकरणाचे काम घेत मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी 1700 कोटींची तरतूद ही केली. दोन वर्षांपूर्वी या कामांचे श्रेय लाटण्यासाठी सरकारने पालिकेला 1700 कोटी देण्याची घोषणाही केली.
– मात्र यातील एक रुपयाही सरकारने अद्याप पालिकेला दिलेला नाही. विशेष म्हणजे पालिका प्रशासनानेदेखील हे पैसे मिळण्यासाठी अद्याप कोणताही पत्रव्यवहार शासनाकडे केलेला नाही. त्यामुळे मिंधे सरकारने पालिकेचे 1700 कोटी बुडवल्याची चर्चा सुरू आहे.
सुशोभीकरणाच्या कामाचे ऑडिट करा
सौंदर्यीकरणाची बहुतांशी कामे ही वॉर्ड स्तरावर निविदा काढून करण्यात आली आहेत. त्यामुळे या निविदांमधील अटींनुसार केलेल्या कामांची देखभाल-दुरुस्ती सुरू आहे का, याचे सखोल ऑडिट करावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई झालेली असल्यास संबंधित पंत्राटदार आणि दुर्लक्ष करणारे अधिकारी यांच्यावरदेखील कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.