बाप्पाच्या विसर्जनासाठी 250 तलाव, ऑनलाइन नोंदणीमुळे वेळही समजणार

महापालिकेकडून मुंबईमधील गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी 250 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत भाविकांना आपला बाप्पा पृत्रिम तलावाच्या ठिकाणी नेऊन मनोभावे विसर्जन करता येणार आहे.

मुंबईमध्ये सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर सवा लाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. या मूर्तींचे विसर्जन पालिकेने बनवलेले पृत्रिम तलाव किंवा समुद्र व इतर नैसर्गिक जलस्थळांवर केले जाते. मात्र या वर्षी पीओपीच्या मूर्ती समुद्र किंवा नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जित करण्यास बंदी घातल्यामुळे पालिकेने पृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे.

घरोघरी जाऊन मूर्ती स्वीकारणार

पालिका सोसायटय़ांच्या गेटवर जाऊन मूर्ती स्वीकारण्याची सुविधा करण्याच्या विचारात आहे. यामुळे पृत्रिम तलावांवर होणारी गर्दी, असुविधा टळणार आहे. मूर्ती विसर्जनाआधी घरातच आरती करून मूर्ती विसर्जनासाठी पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार आहे.

गर्दी-गैरसोयीचा प्रश्न मिटणार

मूर्ती संकलन पेंद्रही सुरू करण्यात येतील. विसर्जनासाठी ऑनलाइन सुविधा असल्यामुळे ठरलेल्या वेळेत मूर्ती विसर्जनासाठी नेता येणार आहे. या ठिकाणी भाविकांना सुविधा देण्यासाठी पालिकेचे सुमारे 25 हजारांवर कर्मचारी तैनात राहणार आहेत.