पगार वेळेत मिळत नसल्याने आंदोलन, परिवहन कर्मचाऱ्यांचा अचानक संप; वसई-विरारकरांची प्रचंड तारांबळ

दर महिन्याला वेळेत पगार मिळत नसल्याने वसई-विरार परिवहन कर्मचाऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला. कोणतीही पूर्वसूचना न देता मंगळवारी या कर्मचाऱ्यांनी अचानक सकाळपासूनच काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे शहरातील परिवहन सेवा ठप्प झाल्याने वसई-विरारकरांची ऐन गर्दीच्या वेळी तारांबळ उडाली.

वसई-विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागाकडून बससेवा पुरवली जाते. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ११४ बसेस असून ३६ मार्गावर ही सेवा दिली जाते. तसेच ४० ई-बसे सही शहरात धावत असतात. मात्र परिवहन सेवेत काम करणाऱ्या चालक-वाहकांना ठेकेदाराकडून वेळेत पगार दिला जात नाही. तसेच इतर सुविधाही देण्याबाबत टाळाटाळ केली जाते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली न गेल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी मंगळावारी सकाळीच संप पुकारला.

वेतन मिळत नाही तोपर्यंत संप मागे नाही

जोपर्यंत वेतन दिले जात नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान बस व्यवस्थापक विभागानेही यावर तोडगा काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. जवळपास ४६५ इतके कर्मचारी काम करतात. त्यांना नियमित वेतन दिले जाते. मात्र यावेळी महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिक, महिला बालकल्याण व अन्य निधीची देयके अदा झाली नाहीत. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटून वेतन देण्यास विलंब झाल्याचे परिवहन व्यवस्थापन विभागाने सांगितले.