
बेकायदा इमारतीवर कारवाई केल्यानंतर निर्माण झालेले डेब्रीज जैसे थे ठेवण्यात आल्याने कुर्ल्यात वाहतूककोंडी तसेच स्थानिकांची गैरसोय होत असल्याचा दावा करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र सदर डेब्रीज हटवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने हायकोर्टात दिली असून न्यायालयाने याची दखल घेत नोव्हेंबर महिन्यात यावर सुनावणी ठेवली आहे.
कुर्ला पश्चिम येथील इस्माईल मंजिल या बेकायदा इमारतीवर बुलडोझर चालवत पालिकेने बांधकाम 10 ऑगस्ट रोजी जमीनदोस्त केले. या पाडकामादरम्यान निर्माण झालेले डेब्रीज तसेच बांधकामाचा मैला रस्त्यावर तसाच पडून राहिल्याने मार्गावर कोंडी झाली आहे. पादचाऱ्यांना येथून चालताही येत नाही तसेच आपत्कालीन प्रसंगी कोणतेही वाहन पोहोचू शकत नाही. त्यामुळे पालिकेच्या या ढिसाळ कारभाराविरोधात कारवाई करण्यात यावी तसेच सदरचा रस्ता मोकळा करण्यात यावा, अशी मागणी करत उबेदूर खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. हुजे कुरेशी यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पालिकेच्या वतीने अॅड. ज्योती म्हात्रे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, पालिकेने सदर डेब्रीज हटवले असून त्या ठिकाणावरील मार्ग मोकळा करण्यात आला आहे. त्याबाबतचे छायाचित्र व प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने याची दखल घेत हे प्रकरण नियमित खंडपीठासमोर सादर करण्यास याचिकाकर्त्यांना सांगितले व सुनावणी तहकूब केली.






























































