
देशात कचरा व्यवस्थापनात अग्रेसर असलेल्या मध्य प्रदेशच्या इंदूर शहराचा आदर्श आता मुंबई महापालिका घेणार आहे. मुंबईत इंदूर पॅटर्न राबवून मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिकेच्या 450 कर्मचाऱयांचा अभ्यास दौरा आयोजित केला आहे. यात अभियंता, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱयांचा समावेश करण्यात आला आहे.
कचरा व्यवस्थापनात इंदूर शहराकडे आदर्श शहर म्हणून बघितले जाते तसेच गेल्या काही वर्षांत ‘स्वच्छ शहर’ म्हणून इंदूर शहराला बहुमान मिळाला आहे. इंदूर शहरातील घनकचरा कचरा व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अभियंता, पर्यवेक्षक असे एकूण 450 कर्मचारी दोन दिवसांच्या अभ्यास दौऱयासाठी इंदूरला जाणार आहेत. यात इंदूरमधील स्वच्छतेच्या व घनकचरा व्यवस्थापन पद्धतीच्या माहिती करून घेऊन प्रशिक्षण व अभ्यासासाठी कर्मचारी जाणार आहेत.
कचरामुक्तीसाठी कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्र
स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ‘स्वच्छ भारत मिशन 2.0’ अंतर्गत मुंबई कचरामुक्तीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिका आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्या सहकार्याने एक हजार टन प्रतिदिन क्षमतेच्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्र उभारणी करत आहे. या प्रकल्पाद्वारे ओल्या कचऱयाचा वापर करून गॅसनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतिदिन एक हजार टन विलगीकरण केलेला ओला कचरा गोळा केला जाणार आहे.























































