मुरलीधर मोहोळ अजूनही गोखले बिल्डरच्या कंपनीचे भागीदार, रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे अद्याप गोखले बिल्डरच्या कंपनीत भागीदार आहेत. त्यांनी केलेले सर्वच व्यवहार संशयास्पद आहेत, असा गंभीर आरोप माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार असून या प्रकरणात ज्यांनी चुकीचे काम केले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्याचे खासदार कलमाडी यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांच्या पक्षाने राजीनामा घेतला. कालांतराने न्यायिक प्रक्रियेत ते सुटले, पण त्या काळात कलमाडींवर कारवाई करण्याचे धाडस काँग्रेसने केले. भाजपनेही या प्रकरणात ईडीची चौकशी करून ट्रस्टी आणि त्यांच्याशी संगनमत करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिज़े  मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे गेले पाहिजे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार असून या प्रकरणात ज्यांनी चुकीचे काम केले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

मुरलीधर मोहोळ यांच्या आरोपाला उत्तर देताना धंगेकर म्हणाले, मोहोळ यांचा या प्रकरणात खुलासा पाहिला त्यात ते किती हतबल झालेत हे दिसून येते. महाराष्ट्रातील कुठे जमिनीचे किती रेट आहेत, अगदी मलबारहीलमधील जमिनीचा रेट किती हे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. मोहोळ ज्याप्रकारे विषय मांडतात, भाजप म्हणून मी बोलत नाही. जैन होस्टेल जमीन व्यवहारातील गोखले, बढेकर, रांजेकर या तिन्ही कंपन्या मोहोळ यांच्याच जवळच्या आहेत. असे असताना मोहोळ हे वाचण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. जैन मंदिरावर दरोडा टाकण्याचं काम मोहोळ यांनी केले. जे विद्येचे माहेर घर आहे ते लुटारूंचे माहेर घर झाले अशी टीका करून धंगेकर म्हणाले.