
ठुणे-पाडाळे रस्त्यावर सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या डोईफोडी नदीवरील पूल आज सकाळी कोसळला. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दहा गावपाड्यांचा मुरबाड तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. विद्यार्थी व ग्रामस्थांचे अतोनात हाल होत असून सरकारने या पुलाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने पूल कोसळला. दरम्यान, लवकरात लवकर या मार्गावर नवा पूल उभारावा अशी मागणी मुरबाडवासीयांनी केली आहे.
मुरबाड तालुक्यात असंख्य गावपाडे असून त्याला जोडणारे साकव तसेच पूल देखील आहेत. मात्र या पुलांच्या देखभालीकडे पाटबंधारे विभाग व प्रशासकीय यंत्रणेने कोणतेही लक्ष दिले नाही. त्यामुळे मुरबाडमधील या पुलांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. ठुणे-पाडावे-वडाची वाडी या रस्त्यावर अंदाजे पन्नास वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता. या पुलाचे कठडे तसेच सिमेंटही निखळले होते. वारंवार तक्रार करूनही त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. अखेर शेवटची घटका मोजत असलेला पूल आज कोसळला. त्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे.
मुरबाड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध ठिकाणी साकव बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र सतत रहदारी असलेल्या बांदलपाडा-ठुणे रस्त्यावरील पुलाकडे लक्ष देण्यात आले नाही.
॥ ग्रामीण भागातील गावपाडांना जोडणाऱ्या रस्त्यांची व पुलांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. मिल्हेगाव वाडी, वडाची वाडी, दुणे, पाडाळे, कोळोशी, बांदलपाडा अशा दहा गावपाड्यांना मुरबाड तालुक्याशी जोडणारा जुना पूल आज जमीनदोस्त झाला.
डोईफोडी नदीवरील कोसळलेल्या पुलामुळे विद्यार्थी व नागरिक यांचा तालुक्याशी असलेला संपर्क अचानक तुटला आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारच ठप्प झाले असून लवकरात लवकर पर्यायी पूल उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
लवकरच प्रस्ताव सादर करणार
मुरबाड तालुक्यातील डोईफोडी नदीवर कोसळलेला पूल हा रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून या पुलावरील धोकादायक मार्ग बंद केला आहे. मात्र पर्यायी मार्ग बनवण्यासाठी सरकारकडे नवीन प्रस्ताव सादर करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय





























































