फक्त एका रसगुल्ल्यासाठी केला खून, लग्नात वर आणि वधू पक्षांमध्ये वादविवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या ताजनगरीत खाण्याच्या एका पदार्थावरून वादविवाद झाला. हा वादविवाद इतका विकोपाला गेला की, वर आणि वधू दोन्ही पक्षांमध्ये जोरदार भांडणे झाली. या भांडणात शस्त्राचाही वापर करण्यात आला. अखेर या प्रकरणाची दखल पोलिसांना घ्यावी लागली.

ही घटना आग्र्याच्या एतमादपूर येथे घडली. येथील खंडौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे व्यावसायिक वॉकर यांचा मुलगा जावेद आणि रशीद यांचे लग्न याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या उस्मान यांच्या मुली जैनब आणि साजिया यांच्याशी निश्चित झाले. एतमादपूर येथील विनायक भवन येथे बुधवारी दोघांचा विवाह होणार होता. त्याआधी सर्व जोडप्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे स्वागत वधू पक्षाने केले. मिरवणूक सभागृहात येताच जेवणं वाढायला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर साधारण एक ते दीड तासांत वरातीला आलेले पाहुणे जेवून आपापल्या घरी परतले होते. लग्नासाठी फक्त काही ठराविक नातेवाईक आणि वराकडील काही पाहुणे उपस्थित होते. लग्नाची तयारी सुरू असतानाच घरातील काही मुले जेवायला बसली. तेव्हा काही पाहुण्यांनी रसगुल्ल्याची मागणी केली. तेव्हा रसगुल्ला वाढणाऱ्या व्यक्तिने रसगुल्ला देण्यास नकार दिला. त्यामुळे पाहुणे आणि त्या तरुणाचे भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की, शस्त्राचा वापरही करण्यात आला. दोन्ही पक्षांमध्ये हे भांडण इतके वाढले की, त्यांनी चाकू, काटे, खुर्च्या फेकून एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. महिला आणि वरातीला आलेल्या ज्येष्ठांनी थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणीच कोणाचे ऐकले नाही. त्यामुळे लग्नाचे वातावरण काही वेळातच बदलले. त्याचे शोकाकुल वातावरणात रुपांतर झाले.

या वादात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान सनी हा 20 वर्षाचा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्याचे काका त्यावेळी मिरवणुकीसह विनायक भवन येथे पोहोचले होते.

लग्नात झालेल्या गदारोळात शाहरुख, निजाम, शकील, जानू, रहमान, रामिया, खंडौली येथील रहिवासी असे 12हून अधिक जण जखमी झाले आहेत. सर्वांवर उपचार सुरू आहेत. वादानंतर खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे, मयत सनीच्या काकांनी आरोप केला आहे की, नराधमांनीही महिलांसोबत असभ्य वर्तन केले आहे. एवढेच नाही, तर त्यांचे दागिनेही लुटण्यात आले आहेत. मिरवणुकीत झालेल्या गदारोळानंतर वर पक्षाकडील मंडळी चिडली. लग्न न करता ते मिरवणुकीसह परत गेले. त्यामुळे वधूच्या कुटुंबात शोककळा पसरली, तर सनीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत.

या प्रकरणाबाबत एसपी ग्रामीण सत्यजित गुप्ता यांचे म्हणणे आहे की, रसगुल्ल्याबाबत लग्नात गदारोळ झाला होता. या घटनेचा पोलीस शोध घेत आहेत. यातली एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.