
मुरूड समुद्र किनारा पर्यटकांच्या अमाप गर्दीने फुलून गेला आहे. त्यामुळे येथील पर्यटन आधारीत व्यवसायिकांसह पर्यटन व्यवसायिक चांगला व्यवसाय होतोय म्हणून चांगलेच सुखावले असले तरी समुद्र किना-यावरील अत्यावश्यक सोयी सुविधांचा अभाव येथे आलेल्या पर्यटकांना मात्र गैरसोयीचे ठरत आहे.
दापोली तालुक्यातील मुरूड समुद्र किनारा हा पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचा किनारा म्हणून ओळखला जातो. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीसह शनिवार आणि रविवारची जोडून सुट्टी आल्याने या समुद्र किना-यावर पर्यटकांच्या उसळलेल्या गर्दीचे तुफान गेल्या दोन दिवसापासून पाहायला मिळत आहे. ऐवढया मोठया प्रमाणात येथे आलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे येथील नामांकितच नव्हे तर सर्वच पर्यटकांसाठीची राहण्याची निवासी ठिकाणे ही हाऊस फुल्ल झालेली आहेत. ऐवढया मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी येथे गर्दी केली आहे. अशाप्रकारची गर्दी बहुतेकवेळा होत असते एवढा मुरूड समुद्र किनारा हा पर्यटकांना भावतो आहे. त्यामुळे या ठिकाणी काही सोयी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे मात्र तसे होताना अजिबातच दिसत नाही.
जोडून सुट्ट्या अथवा हंगामात नेहमीच पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या या मुरूड समुद्र किना-यावर अनेक प्रकारच्या गरजेच्या अत्यावश्यक अशा सोयी सुविधांची वानवा आहे. स्थानिकांसह पर्यटन व्यवसायिकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या पर्यटन व्यवसायाला अधिकची बळकटी येण्यासाठी येथील रस्त्यांची सुधारणा जशी महत्वाची आहे. तसे समुद्र किनाऱ्यावर यापूर्वी असलेले महिला आणि पुरूषांसाठीचे स्वतंत्र अशा स्वच्छतागृहाच्या जमिनदोस्त झालेल्या दोन्ही इमारतीचे पर्यटकांच्या सोयीसाठी नव्याने बांधकाम केले पाहीजे की ज्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करताना लघु शंका झाली अथवा समुद्राच्या पाण्यात स्नान केल्यानंर कपडे बदलण्यासाठी सुरक्षित वाटेल अशी जागा असेल. तसेच या ठिकाणी आलेल्या समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी यापूर्वी उभारण्यात आलेल्या सुरक्षा वॉच टॉवरचे नामोनिशान मिटले आहे ते पुन्हा उभे करून पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावर प्रकाशाची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे ठिकठिकाणी दिशादर्शक नामफलक लावण्यात आले पाहिजेत की ज्यामुळे पर्यटकांना धोक्याची ठिकाणे वा अन्य बाबींची माहिती अवगत होईल. आदी प्रकारच्या अनेक अशा पर्यटनासाठीच्या सोयी सुविधांच्या पूर्ततेसाठी शासन लक्ष देईल का ? अशाप्रकारचा सवाल स्थानिकांसह येथे पर्यटनासाठी आलले पर्यटक उपस्थित करत आहेत.


























































