
मुसळधार पावसामुळे पर्यटनस्थळ असलेल्या मुरुडमधील रस्त्यांची वाट लागली आहे. हे रस्ते बुजविण्याचे काम सध्या सुरू असून त्यासाठी दगड आणि मातीचा वापर करा, असा अजब फतवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनी काढला आहे. त्यामुळे बिनधास्तपणे ठेकेदार खड्डे बुजविण्यासाठी डांबराऐवजी दगड, माती वापरत असल्याने मुरुडकरांना पुन्हा खड्डय़ातूनच प्रवास करावा लागणार आहे.
मुरुड तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक 4 हजार 66 मिलिमीटर एवढा पाऊस पडला. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पर्यटक व स्थानिक वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. दर शनिवार, रविवार व अन्य सुट्टीच्या काळात राज्याच्या विविध भागांतून मुरुडचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक येतात. मात्र रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे त्यांना खड्डय़ांच्याच ‘सौंदर्या’चा अनुभव घ्यावा लागतो.
सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरुडमधील खड्डे बुजविण्यास काही प्रमाणात सुरुवात केली आहे, पण हे खड्डे बुजवीत असताना डांबराचा वापर करण्याऐवजी चक्क दगड, माती टाकली जात असल्याची धक्कादायक बाब सामाजिक कार्यकर्ते संदीप घरत यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी तेथील कामगारांना रोखले आणि जाब विचारला. त्यावर या कामगारांनी आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनीच दगड व माती वापरण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले.
कारवाईची मागणी
सदरचा प्रकार अतिशय गंभीर असून कडकडीत ऊन पडले असतानाही चांगल्या दर्जाचे डांबर वापरण्याऐवजी माती व दगड खड्डय़ात टाकून काय साध्य होणार? असा संतप्त सवाल मुरुडवासीयांनी केला आहे. दरम्यान दगड, माती टाकण्याचा आदेश देणाऱया संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
























































