कमी खर्च, कमी श्रम आणि चांगले उत्पन्न; पालघरच्या आदिवासींना अळंबी पावली

पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असून तेथील शेतकरी हा भातशेतीवर अवलंबून आहे. परंतु नैसर्गिक आपत्तींमुळे उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न या आदिवासी शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी डहाणूच्या कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेत या महिलांसाठी अळंबी म्हणजेच मशरूमचा जोड व्यवयास उपलब्ध करून दिला आहे. कमी खर्च, कमी श्रम आणि चांगल्या उत्पन्नामुळे हा व्यवसाय आदिवासींना उपयुक्त ठरला असून रोजगार नवी संधी बनला आहे.

कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्र हे महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील दुसरे केंद्र असून गेल्या ४९ वर्षांपासून शेती व संलग्न क्षेत्रांमध्ये संशोधन, प्रशिक्षण आणि विस्तार सेवा देत आहे. शेतकऱ्यांच्या गरजांनुसार आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवणे, शेती विकास साधणे, तसेच पूरक व्यवसायांचा प्रसार करण्याचे काम केंद्राच्या माध्यमातून केले जाते. अळंबी उत्पादनासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत आदिवासी भागातील महिला व तरुणांसाठी एक ते आठ दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाते. या शिबिरात गृहविज्ञान तज्ज्ञ रुपाली देशमुख या अळंबी विषयी प्रात्यक्षिक व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव हे उद्योजकता विकास व मार्केटिंग या विषयांवर मार्गदर्शन करतात. आजपर्यंत या केंद्राने अनेक शिबिरे आयोजित केली असून शेकडो महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे.

डहाणूतील शेणसरी व गांगोडी ग्रामपंचायतीतील महिला बचत गट व युवकांनी अळंबी उत्पादन व्यवसाय सुरू केला आहे. भातशेतीनंतर काही काम नसल्याने अनेकजण स्थलांतर करतात. पण अळंबी उत्पादनासारखा पर्यायी व्यवसाय सुरू झाल्यास महिला व युवकांना गावातच रोजगार मिळेल आणि त्यांचे स्थलांतर थांबेल.

साधना बोरसे, गांगोडी सरपंच