
कोल्हापुरात मटण दरवाढ झाल्याने तिथल्या मटणशौकीनांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला होता. कोल्हापुरापाठोपाठ आता मुंबईतही मटणाचे दर कडाडले असून इथे मटणाचा दर किलोमागे 600 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.काही दिवसांपूर्वी हा दर 500 रुपये इतका होता. 25 डिसेंबरनंतर दरात थेट 100 रुपयांची वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. कांदा आणि टॉमेटोच्या भाववाढीची झळ सोसणाऱ्या मटणप्रेमींना या वर्षाचा शेवट तरी चांगला जाईल अशी आशा होती. मात्र नवीन वर्ष सुरू होईपर्यंत मटणाचे दर चढेच राहणार असल्याने त्यांच्या आशा धुळीस मिळण्याची शक्यता आहे.
देवनार इथला कत्तलखाना पश्चिम हिंदुस्थानातील स्वस्त आणि प्रसिद्ध कत्तल खाना आहे. इथे दर गुरुवारी आणि शनिवारी जवळपास 20 ते 30 हजार बकऱ्या कापण्यासाठी आणल्या जातात. या बकऱ्या प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थानातून आणल्या जातात. गेल्या काही महिन्यांपासून या बकऱ्या देवनार इथे आणण्याऐवजी कर्नाटक, केरळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विकल्या जात आहेत. त्यामुळे देवनार कत्तलखान्यात बकऱ्या येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. महाराष्ट्रापेक्षा बकऱ्यांना गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये भाव जास्त मिळतो. इथल्या बकरीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बकऱ्यांचे विक्रेते मुंबईत स्वस्त दरात बकऱ्या खरेदी करतात आणि गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये विकून नफा कमावतात असं निदर्शनास आलं आहे. बकऱ्यांचे कत्तलखान्यात येण्याचे प्रमाण कमी झाल्याने मागणी वाढली आहे पण पुरवठा कमी झाला आहे. साहजिकच आहे यामुळे मटणाचे दर वाढले आहेत.
मटणदरवाढीला सुरूवात ही कोल्हापुरात झाली होती. गेल्या महिन्यात कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये मटणविक्रेत्यांनी मटणाच्या दरात किलोला दोनशे रुपयांपर्यंत वाढ केली होती. साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत मिळणारे मटण यामुळे सहाशे रुपये किलोपर्यंत गेले होते. कोल्हापुरात मटण आवडीने खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे या दरवाढीला मोठा विरोध झाला. या विरोधामुळे मटणाचे दर कमी करण्यासाठी आंदोलन सुरू झालं होतं. कोल्हापुरातील काही तालीम मंडळानी बकऱ्यांची एकदम खरेदी करून त्याचे मटण सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यायला सुरूवात केली होती. या दरवाढीचे पडसाद कोल्हापुरातील महापालिकेमध्येही उमटले होते. राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन राज्यात दरवर्षी बकऱ्यांचं सर्वाधिक उत्पादन होतं. मात्र अवकाळी पावसामुळे अनेक बकऱ्यांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी अपुऱ्या खाद्यामुळे बकऱ्या वजनात भरू शकल्या नाहीत. यामुळे मटणविक्रीवर त्याचा परिणाम झाला होता. मटणदरवाढीने हैराण झालेल्या काही नागरिकांनी गारगोटी आणि कडगाव ग्रामपंचायतींना दरवाढीप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती. या ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करत मटणाचे दर 360 ते 380 रुपये करावे अन्यथा दुकान बंद करावे अशा नोटीसा मटण विक्रेत्यांना बजावल्या होत्या. या नोटिशींविरोधात विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मटणाप्रमाणेच अंड्यांचेही दर वाढायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी किरकोळ बाजारात अंड्यांचे दर प्रति डझन 60 रुपयांवरून 70 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. थंडी वाढल्यास हे दर शेकड्यामागे 15 ते 20 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि या शहरांच्या आसपासच्या सगळ्यां परिसरात मिळून जवळपास सव्वा लाख अंडी विकली जातात. बकऱ्यांप्रमाणेच अवकाळी पावसामुळे कोंबड्याही मोठ्या प्रमाणावर मृत पावल्या होत्या. त्यातच पशूखाद्य महागल्याने पोल्ट्री पोल्ट्रीफार्म चालकांनी कोंबड्यांच्या दरात वाढ केली आहे.




























































