चिंचवड विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये निर्मिती झाली. त्यावेळी दिवंगत लक्ष्मण जगताप विधानपरिषदेचे आमदार होते. त्यांनी माझा प्रचारप्रमुख होण्याची तयारी दर्शविली. काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळाली असताना जगताप यांनी नेतृत्वाचा आदेश असल्याचे सांगत अपक्ष निवडणूक लढविली. अजित पवार यांच्यामुळे माझा पराभव झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केला. तसेच कोणत्याही परिस्थितीत चिंचवड विधानसभा निवडणूक लढविणारच असून, सर्व पक्षांची दारे खुली असल्याचेही भोईर यांनी स्पष्ट केले.
रहाटणी येथे बुधवारी महानिर्धार मेळावा घेऊन भोईर यांनी चिंचवडमधून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, अरुण पवार, राजेंद्र साळुंखे, सुजित पाटील, गणेश लोंढे, राजाभाऊ गोलांडे, सतीश दरेकर यावेळी उपस्थित होते.
शहरातील विद्यमान राज्यकर्त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता असे राज्यकर्त्यांचे समीकरण झाले आहे. दडपशाही, झुंडशाही मोडीत काढण्यासाठी मी निवडणूक लढविणारच आहे.