निसर्गप्रेमींनी वाचविले 14 जखमी पक्ष्यांचे प्राण

195

संक्रांत सणाच्यावेळी मोठ्या प्रमाणावर संक्रांत येते ती पक्षीजीवनावर. स्वत:साठी व आपल्या पिलांसाठी अन्नाच्या शोधात बाहेर पडलेले असंख्य पक्षी या महिनाभरात पतंगाच्या विशेषत:नायलॉन मांजामुळे घायाळ होऊन मृत्युमुखी पडतात अथवा जखमी होतात. त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी निसर्गप्रेमींच्या बर्ड हेल्पलाईन या उपक्रमामध्ये आता अनेक नवीन निसर्गप्रेमी जोडले जात आहेत.

यावेळी 5 जानेवारी ते 16 जानेवारी या कालखंडात जिल्हाभरात मांजात अडकून जखमी झालेल्या 14 पक्षांवर उपचार करण्यात आले, अशी माहिती संस्थेचे संस्थापक जयराम सातपुते यांनी दिली. यावर्षी पतंगाच्या दुकानांवर झालेल्या कारवाया व जागरूकता वाढल्याने अनेक पतंगप्रेमींनी स्वत:हुन नायलॉन मांजाचा वापर न केल्याने मागील वर्षीच्या तुलनेत जखमी पक्षांचे हे प्रमाण निम्म्या पर्यंत घटले असल्याचेही निदर्शनास आले आहे. झाडांमध्ये अडकलेल्या मांजामुळे संक्रांतीनंतरही पक्षी त्यात अडकल्याच्या घटना घडतात म्हणुन आपल्या घर, परिसरातील हे धागे काढून टाकण्याचे आवाहनही निसर्गप्रेमींतर्फे करण्यात आले आहे.

वंचक, कोकीळ, खंड्या, शिक्रा, बगळा, रॉबीन, पारवा, पाकोळी, कापशी या प्रजातींच्या एकुण 14 पक्षांपैकी 11 पक्षांवर यशस्वी उपचार केले गेले. शहरी भागात मोठ्या संख्येने निवास करणार्‍या पारवा या पक्षांची संख्या जखमींमध्ये 5 एवढी होती. दुर्मिळ पक्षांमध्ये गणले जाणारे जखमी गव्हाणी घुबड मृतावस्थेत सापडल्यानेही निसर्गप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. तर खंड्या, शिक्रा, कापशी या अन्नसाखळीतील महत्वाच्या स्तरांवरील पक्षांना वाचवण्यात कार्यकर्त्यांना यश आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या