नगर जिल्हय़ाला परतीच्या पावसाने पुन्हा झोडपले, ऑक्टोबर महिन्यात 100 म़ि मी. पाऊस

परतीच्या पावसाने मंगळवारी रात्री पुन्हा एकदा हजेरी लावली. जिह्यात अनेक भागांत मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. जिह्यात सगळीकडेच कमी-अधिक प्रमाणात मोठा पाऊस झाला. हा पाऊस सुमारे दोन तास सुरू होता. ऑक्टोबर महिन्यात जिह्यात 100 मिलिमीटर पाऊस झाला असून, कालच्या पावसाची 8 मिलिमीटर नोंद झाली आहे.

मंगळवारी दिवसभर ऊन असले तरी पावसाचे वातावरण नव्हते. मात्र, सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. नगर शहरासह नेवासा, राहुरी, अकोले तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. नगर तालुक्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. नगर शहरात सायंकाळी सात वाजता पावसास सुरुवात झाली. हा पाऊस 9 वाजेपर्यंत सुरू होता. या पावसाने पिकांचे आणखी नुकसान झाले आहे. पाण्यात बुडालेली पिके काढण्यात शेतकरी व्यग्र असताना मंगळवारच्या पावसाने आता आणखी शेतात पाणी साचले आहे.

दरम्यान, जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत जिह्यात सरासरी 767 मि. मी. एवढा पाऊस झाला आहे. ऑक्टोबर महिन्यातही जिह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. ऑक्टोबरमध्ये 100.8 मि. मी. पाऊस झाला आहे.

धरणांतून विसर्ग सुरूच

आज सकाळी सहा वाजता ओझर बंधाऱयातून 2 हजार 122, नांदूरमध्यमेश्वर 2 हजार 421, जायकवाडी 18 हजार 864, दौंड पूल 3 हजार, मुळा धरणातून 2 हजार, तर सीना धरणातून 364 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कुकडीच्या पुरात रिक्षाचालक बेपत्ता
कुकडी नदीच्या पुरामध्ये हात-पाय धुण्यासाठी गेलेला इसाक रहेमान तांबोळी (वय 35, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) हा रिक्षाचालक तोल जाऊन पडल्याने वाहून गेल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमरास घडली. पोलीस प्रशासनाकडून बुधवारी दिवसभर रिक्षाचालकाचा शोध घेण्यात येत होता, परंतु उशिरापर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता.

आपली प्रतिक्रिया द्या