नगर जिह्यात महाविकास आघाडीची सरशी; भाजपलाही यश 16 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा; शिंदे गटाला केवळ एका जागेवर यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिह्यातील 203पैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, 195 ग्रामपंचायतींसाठी दोन दिवसांपूर्वी मतदान प्रक्रिया पार पडली. या ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी पार पडली. यामध्ये दिग्गजांना फटका बसला असून, आपआपले गड शाबूत राखण्यात संबंधित आमदारांना यश आले आहे. दरम्यान, जिह्यातील 127 गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली असून, 126 गावांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. 16 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, शिंदे गटाला जिह्यात केवळ एका ग्रामपंचायतीत यश मिळाले आहे. नऊ ठिकाणी स्थानिक आघाडय़ांना यश मिळाले असून, सात गावांमध्ये अपक्षांनी बाजी मारली आहे.

संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 34, अकोले 11, जामखेड 3, कर्जत 8, कोपरगाव 26, नगर 26, नेवासे 13, पारनेर 16, पाथर्डी 11, राहाता 12, शेवगाव 12, श्रीरामपूर 6, राहुरी 11 व श्रीगोंदा 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. यांतील आठ ग्रामपंचायती आणि 15 सरपंचांच्या निवडी बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 195 ग्रामपंचायतींसाठी रविवारी 81 टक्के मतदान झाले होते. मंगळवारी सकाळी जिह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली.

नेवासा तालुक्यात शिवसेनेचे आमदार शंकरराव गडाख यांचे वर्चस्व कायम राहिले. सर्व 13 ग्रामपंचायतींचे सरपंच शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले. तालुक्यातील माका, माळी चिंचोरा, वडाळा, भेंडा खुर्द, कांगोणी, अमळनेर, हंडी निमगाव, खुपटी, शिरेगाव, चिंचवन, हिंगोली, सुरेशनगर या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची सासुरवाडी असलेल्या कांगोणी गावात मुरकुटे यांचे मेहुणे बंडू शिंदे यांची सत्ता होती. येथे शिवसेनेचे सुधाकर कराळे विजयी झाले. 11पैकी आठ सदस्य मुरकुटे गटाचे, तर तीन सदस्य आमदार गडाख यांच्या गटाचे निवडून आले आहेत. माळी चिंचोरा येथेदेखील अनेक वर्षे सत्ता असलेले तुकाराम शेंडे यांची सत्ता उलथवून टाकत मुळा कारखान्याचे माजी संचालक एकनाथ धानपुणे गटाने विजय मिळविला.

कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांना भाजपचे माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी धक्का दिला आहे. आठ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालामध्ये माजी मंत्री राम शिंदे व भाजपने तालुक्यात वर्चस्व मिळविल्याचे दिसून आले. यावेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांच्या गटाचा त्यांच्या स्वतःच्या आळसुंदे गावामध्ये पराभव झाला. दुसरीकडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम यादव यांच्या नेतृत्वाखाली दोन सरपंच निवडून आले आहेत.

राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींत पाच ग्रामपंचायतींत तनपुरे गटाचे, चार ग्रामपंचायतींत कर्डिले-विखे गटाचे, तर दोन ग्रामपंचायतींत स्थानिक विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

पारनेर तालुक्यातील निवडणूक झालेल्या 16 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत मंडळाचा झेंडा फडकला आहे, तर दोन ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. एका ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या महिला उमेदवार सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. वनकुटय़ाचे मावळते सरपंच राहुल झावरे यांच्या पत्नी स्नेहल झावरे, ढवळपुरीचे मावळते सरपंच डॉ. राजेश भनगडे यांच्या पत्नी विद्या भनगडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

राहाता तालुक्यातील सर्व 12 ग्रामपंचायतींवर भाजपच्या विखे गटाचाच विजय झाला आहे. स्थानिक पातळीवर विखे गटाच्या विरोधात विखे गटाचीच लढाई होती. नांदुर्खी बु. डोऱहाळे, राजुरी, नपावाडी, निघोज, आडगाव, नांदुर्खी खु., खडकेवाके, रांजणखोल, सावळीविहीर बु., साकुरी आदी गावांसाठी निवडणूक झाली, तर लोहगाव ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वीच सर्व सदस्य आणि सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.

कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून, काळे गटाने 15 जागा घेऊन बाजी मारली आहे, तर कोल्हे गटाला नऊ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना व अपक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. 26 ग्रामपंचायतींपैकी 16 ग्रामपंचायतींचा कारभार महिला सरपंचांच्या हाती आला आहे. 26 ग्रामपंचायतींच्या 248 सदस्यांपैकी काळे गटाला 130, कोल्हे गटाला 108, शिवसेनेला 6, परजणे गटाला 2 व अपक्षांना 2 जागा मिळाल्या आहेत. धारणगाव व हंडेवाडी या दोन ठिकाणी सदस्यांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठय़ा टाकण्यात आल्या. दोन्ही ठिकाणी ‘ईश्वरी कौल’ कोल्हे गटाला मिळाला.

जामखेड तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायतींचे निकल जाहीर झाले असून, झालेल्या चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत रत्नापूर व राजुरीत राष्ट्रवादी, तर शिऊर ग्रामपंचायतीमध्ये भाजपकडे सरपंचपद आले आहे. रत्नापूरमध्ये राणी जाधव, राजुरीमध्ये अश्विनी कोल्हे, तर शिऊरमध्ये गिरिजा उतेकर यांची सरपंचपदी निवड झाली आहे.

पाथर्डी तालुक्यातील 11पैकी सहा ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला, तर दोन ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व प्रहार जनशक्ती मंचाने सत्ता हातात घेत तालुक्यात खाते उघडले. भालगावात भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या पॅनेलचा पराभव झाला, तर तिसगाव येथे गेल्या 45 वर्षांपासून काशिनाथ लवांडे यांच्या अधिपत्याखाली असलेली सत्ता विरोधकांनी ताब्यात घेतली. कोल्हार येथे शिवसेनेने सरपंचासह बहुमताने ग्रामपंचायत ताब्यात घेतली.

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर सोपान बिडणर व मुरकुटे-ससाणे गटाचे सर्व सात सदस्य विजयी झाले आहेत. माळेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मुरकुटे गटाच्या जयश्री सोपान औताडे, तर आठ जागा ससाणे-आदिक गट व एक जागा मुरकुटे गटास मिळाल्या आहेत. खंडाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विखे-कानडे गटाच्या छाया लक्ष्मण बर्डे, तर आठ जागा विखे-कानडे गटाला व सात जागा मुरकुटे- ससाणे गटाला मिळाल्या आहेत. उंबरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराज भोसले गटाच्या सुप्रिया विराज भोसले, तर तीन जागा विराज भोसले गटाला व सहा जागा मुरकुटे-ससाणे गटाला मिळाल्या आहेत.

अकोले तालुक्यात निवडणूक झालेल्या नऊ ग्रामपंचायतींचे आज निकाल जाहीर करण्यात आले. त्यांत नऊपैकी सात सरपंच आपल्या पक्षाचे विजयी झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे, तर दोन ठिकाणी भाजपचे सरपंच विजयी झाल्याचे सांगितले जात आहे. 11 ग्रामपंचायतींपैकी सोमलवाडी व शिळवंडी या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. नऊ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली.

शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींसाठी तहसील कार्यालयात आज  मंगळवारी मतमोजणी झाली. यामध्ये राष्ट्रवादीकडे आठ, भाजपकडे तीन, तर  राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभुवाडगाव, खामगाव, रावतळे-कुरुडगाव, जोहरापूर, खानापूर, भायगाव, रांजणी व दहीगाव या आठ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांवर विजय मिळविला. वाघोली, सुलतानपूर, अमरापूर येथील सरपंचपदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर आखेगाव सरपंचपदावर जनशक्ती विकास आघाडीचा विजय झाला.

नगर तालुक्यातील जखणगाव, खातगाव, नांदगाव, नेप्ती, बाबुर्डी बेंद, पिंपळगाव कौडा, सोनेवाडी-चास, सारोळा कासार, दहीगाव, साकत, वडगाव तांदळी, राळेगण म्हसोबा, वाळकी, आठवड, मदडगाव, नारायणडोहो, सारोळा बद्दी, उक्कडगाव, कौडगाव, सोनेवाडी पिला, रांजणी, आगडगाव, पांगरमल, कापूरवाडी, शेंडी या गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी झाली. पिंपळगाव लांडगा गावाची निवडणूक याआधीच बिनविरोध पार पडली होती. कर्डिले गटाने 18 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली असून, राष्ट्रवादीने सहा, शिवसेनेने दोन, तर काँग्रेसने एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध केले आहे.

दोन सदस्य चिठ्ठीद्वारे विजयी घोषित

नगर तालुक्यातील टाकळी खातगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दोन ठिकाणी समसमान मते मिळाली होती. त्यामुळे निवडणूक प्रशासनाकडून चिठ्ठीद्वारे विजय घोषित करण्यात आला. आसमा शेख व प्रीती नरवडे हे सदस्य चिठ्ठीद्वारे विजयी जाहीर करण्यात आले.

जखणगावमध्ये ‘नोटा’ला जास्त मते

नगर तालुक्यातील जखणगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग-2मध्ये उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मते मिळाली होती. त्यामुळे निवडणूक प्रशासनाने ‘नोटा’नंतर दुसऱया क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवारास विजयी घोषित केले. या प्रभागात सुनील झिरवडे व अरुण सूर्यवंशी हे दोन उमेदवार होते. झिरवडे यांना ‘नोटा’नंतर दुसऱया क्रमांकाची 144, तर सूर्यवंशी यांना 112 मते मिळाली होती. त्यामुळे झिरवडे यांना विजयी घोषित करण्यात आले.

श्रीगोंद्यात आमदार पाचपुतेंच्या अस्तित्वाला धक्का

श्रीगोंदा तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ, काँग्रेस एक, तर भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाला भोपळाही फोडता आला नाही. त्यातच त्यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांचा चुलतभावाने स्वतःच्या काष्टी गावातच पराभव केल्याने त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का बसला आहे.

संगमनेर तालुक्यावर बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व

संगमनेर तालुक्यातील 37पैकी 26 ग्रामपंचायतींवर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटाने वर्चस्व कायम राखले आहे. मात्र, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही संगमनेरची निवडणूक प्रतिष्ठsची केल्याने नऊ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदी त्यांच्या गटाच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. दोन ग्रामपंचायतींमध्ये अपक्ष सरपंचांनी बाजी मारली. विशेष म्हणजे, अपक्ष निवडून आलेल्या दोन्ही महिला आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावासह तळेगाव, कनकापूर, कोल्हेवाडी, निंबाळे, निमोण, मालुंजे, रहिमपूर आणि सादतपूर येथील सरपंचपदी विखे गटाच्या जनसेवा मंडळाच्या उमेदवारांची वर्णी लागली असून, महत्त्वपूर्ण असलेल्या घुलेवाडीसह निळवंडे येथील सरपंचपदी दोन्ही अपक्ष महिला विजयी झाल्या आहेत. निळवंडे येथे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या सासूबाई शशिकला पवार निवडून आल्या आहेत. डोळासणे व सायखिंडी येथे बिनविरोध निवडून आलेले सरपंच शेतकरी विकास मंडळाचे असून, याशिवाय अंभोरे, उंबरी बाळापूर, ओझर खुर्द, करुले, कर्जुले पठार, कोळवाडे, खराडी, चिंचोली गुरव, चिकणी, जांबूत बुद्रुक, जांभूळवाडी, दरेवाडी, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक, निमगाव भोजापूर, निमगाव जाळी, पिंपरणे, पोखरी हवेली, रणखांबवाडी, वडझरी खुर्द, वडझरी बुद्रुक, वाघापूर, साकूर आणि हंगेवाडी येथे शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार सरपंचपदी विजयी झाले आहेत.