मांडूळ तस्करी करणार्‍या सात जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

मांडूळाची तस्करी करणाऱ्या सातजणांच्या टोळक्याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळ दुर्मीळ मांडुळ सापासह एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

विजय अशोक वाघ (वय 20, रा.नविन कायगाव गायरान, ता.गंगापूर, जि.संभाजीनगर), विष्णु काशिनाथ जाधव (वय 30, रा.तांदुळवाडी, ता.गंगापुर, जि.संभाजीनगर), राधाकिसन बाजीराव काळे(वय 41, रा.नांदर, ता.पैठण, जि.संभाजीनगर), गणेश अशोक माळी(वय 28, ता.पैठण, जि.संभाजीनगर), ज्ञानेश्‍वर अभिमान गोरे(वय 35, ता.पैठण, जि.संभाजीनगर), छबु बबन गायकवाड (वय 40, रा.अंबेगाव, ता.गंगापुर, जि.संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

दोन व्यक्ती कोतवाली हद्दीमध्ये एक प्लास्टीकची पिशवी घेऊन फिरत असताना पोलिसांची त्यांच्यावर नजर पडली. पोलिसांना बघताच आरोपी पिशवी लपवू लागले. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. कोतवालीचे पोलीस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या पथकाने या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता पिशवीत मांडुळ असल्याचे त्यांनी सांगितले. शरद सुपेकर (रा.कौठा,ता.श्रीगोंदा) यांच्या शेतात उसतोडणीचे काम करत असताना चार ते पाच दिवसापूर्वी मांडुळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मांडूळ विकण्यासाठी आम्ही आमच्या नातेवाईकांकडे म्हणजेच राधाकिसन काळे व अन्य जणांकडे निघालो असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या घटनेची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी नेवासा येथे जाऊन अधिक माहिती घेतली असता हे टोळके मांडूळाची तस्करी करत असल्याचे उघड झाले.