नगर महापालिका निवडणूक: आचारसंहिता भंगाच्या अकरा तक्रारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून 29 नोव्हेंबर अखेर आचारसंहिता कक्षाकडे एकूण 11 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध दोन, खासदार दिलीप गांधी यांच्या विरुद्ध एक तक्रार प्राप्त झाली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी एक नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता कक्षाचे प्रमुख म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी विविध पथकांची नेमणूकही करण्यात आली आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ते 29 नोव्हेंबर अखेर या कक्षाला एकूण अकरा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारीचे स्वरुप पाहून त्यासंबंधित विभागांना पुढील कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध शिवसेना उपनेते अनिल राठोड व केतन गुंदेचा यांनी प्रत्येकी एक तक्रार केली आहे. या तक्रारींची दखल घेत त्यानुसार प्रस्ताव करून तो पुढील मार्गदर्शनासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच खासदार दिलीप गांधी यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार गिरीष जाधव यांनी केली आहे. गांधी हे नगर अर्बन बँकेचे चेअरमन आहेत. नगर अर्बन बँकेचा स्टाफ मनपा निवडणुकीसाठी खासदारांच्या घरी कार्यरत आहे, अशा आशयाची ही तक्रार आहे. ही तक्रार केंद्रीय निबंधक सहकारी संस्था तथा सहसचिव सहकारी व कृषी विभाग, कृषी संचलनालय नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. तसेच या तक्रारीबाबत खासदार गांधी यांच्याकडे सुद्धा खुलासा मागण्यात आला आहे.

याशिवाय आचारसंहितेच्या काळात रस्त्याचे काम करणे, पक्षाचे चिन्ह असलेला आकाश कंदील लावणे, वाहनाला परवानगी नसताना त्याद्वारे प्रचार करणे, शहरात उभारण्यात आलेले हायमॅक्स दिवे, समाज मंदिरे, यावर विविध पक्षाचे चिन्ह असलेले फलक, खासदार, आमदार, नगरसेवक यांची नावे असलेले फलक दिसत असल्याच्या तक्रारी या कक्षामध्ये प्राप्त झाल्या आहेत. यासर्व तक्रारींची दखल घेऊन त्यांचे तात्काळ निवारण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.