पारनेर हल्लाप्रकरणी माजी नगराध्यक्ष विजय औटींसह 16 जणांवर गुन्हा

खासदार नीलेश लंके यांचे निकटवर्तीय, नीलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव अॅड. राहुल झावरे यांच्यावर गुरुवारी  झालेल्या जीवघेण्या हल्लाप्रकरणी अॅड. झावरे यांनी रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून माजी खासदार सुजय विखे समर्थक, पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, त्याचा भाऊ माजी नगरसेवक नंदकुमार औटी यांच्यासह एकूण 16 जणांविरोधात खुनाचा प्रयत्न आणि विविध कलमांन्वये पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या चौघांना शुक्रवारी पारनेर न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.

विजय सदाशिव औटी, नंदू सदाशिव औटी, प्रितेश पानमंद, अंकुश भागाजी ठुबे, नीलेश उर्फ धनु दिनकर घुमटकर, संगम सोनवणे, नामदेव लक्ष्मण औटी, मंगेश सुभाष कावरे, पवन बाबा औटी, प्रमोद जगन्नाथ रोहोकले, प्रथमेश दत्तात्रेय रोहोकले, सुरेश अशोक औटी व इतर अनोळखी 3 ते 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 13 मे रोजी मतदानाच्या दिवशी अॅड. झावरे यांच्या वनकुटे गावातील ग्रामस्थांनी विजय औटी यास गावातून हाकलून दिले होते. या अपमानाच्या रागातून हल्ला केल्याचे अॅड. राहुल झावरे यांनी जबाबातून सांगितले.

अॅड. राहुल झावरे व त्यांचे सहकारी राजेंद्र तराळ यांच्यासह कारमधून पारनेरमध्ये येत असताना वरील आरोपींनी त्यांची कार अडवून दोघांना कारच्या खाली उतरवले. कोयत्याने कारची काच पह्डून झावरे यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यात वीट मारून गजाने मारहाण करण्यात आली. तसेच कोयत्यानेही मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी तो वार चुकवल्याने डाव्या खांद्यास जखम झाली. आरडाओरड सुरू असल्याने अॅड. झावरे यांच्या ओळखीचे लोक धावत येऊन त्यांनी त्यांची मारहाणीतून सुटका केली. त्यानंतर अॅड. झावरे यांना पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले.