राहुरी शहरात भररस्त्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तेथे उपस्थित तरुणांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला तरुणांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पालक वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.
राहुरी शहरातील मुलनमाथा परिसरात कुटुंबासोबत राहते. शनिवारी सकाळी पीडित मुलगी वडील काम करत असलेल्या दुकानात पैसे आणण्यासाठी गेली होती. तेथून घरी परतत असताना आरोपीने तिला गाठले.
मी तुला तुझ्या आईकडे सोडतो असे आरोपी मुलीला म्हणाला. मात्र मुलीने नकार दिल्याने आरोपीने बळजबरीने तिला हात धरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने आरडाओरडा केल्याने आसपास उभे असलेले तरुण धावत आले. तरुणांनी मुलीची विचारपूस केली असता मुलीने सर्व प्रकार सांगितला.
तरुणांनी सदर आरोपीला पकडून विचारणा केली असता त्याने आधी मुका असल्याचे सोंग घेतले. मात्र तरुणांनी यथेच्छ धुलाई केल्यानंतर आरोपी बोलू लागला. आरोपी शिट्टी मारून कुणाला तरी इशाराही केला. तरुणांनी आरोपीला तात्काळ राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.