बोल्हेगांव फाटा ते गणेश चौक रस्त्याचे काम लटकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

महापालिकेच्या उपनगरातील बोल्हेगांव फाटा ते गणेश चौक रस्त्याचे मंजूर असलेले काम गेल्या ४ महिन्यांपासून रखडले आहे. ठेकेदाराने रस्ते खोदून ठेवल्याने झालेल्या खड्ड्यांमुळे आणि धुळीने नागरिक हैराण झाले आहेत. सदर काम तातडीने सुरु न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या भागातील नगरसेवकांनी दिला आहे.

यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांची नगरसेवक अशोक बडे, नगरसेविका कमल सप्रे, रिता भाकरे, दत्तात्रय सप्रे, निलेश भाकरे, सिमोन भाकरे, संतोष धोत्रे, अतिकेश सातकर, दत्ता बारस्कर, सागर जपे,सुलतान शेख, महेश इनामदार, विकास परदेशी, विजय लांडे, शरफुद्दीन सय्यद, दत्ता शेजूळ, भगवान कोतकर, गोरख जगताप यांच्यासह शिष्ट मंडळाने भेट घेवून निवेदन दिले. यामध्ये म्हंटले आहे की, महापालिकेच्या प्रभाग ७ मधील बोल्हेगांव फाटा ते गणेश चौक या रस्त्याचे काम मंजूर असून हा रस्ता ठेकेदाराने गेल्या ४ महिन्यापासून खोदून ठेवला आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असते. रस्ता खोदल्यामुळे नागापूर बोल्हेगाव येथील नागरिकांना येण्याजाण्यासाठी अडचण होते. त्या ठिकाणी खड्डे झाले असून नागरिक, महिला, मुले घसरून पडतात व तेथे मोठया प्रमाणात अपघात होतात. त्याठिकाणी आतापर्यंत बरेच नागरिक जखमी झालेले आहेत. तसेच रस्त्यातील खड्यामुळे धुळीचे साम्राज्य झाले असून परिसरातील दुकानांमध्ये धुळ जाते.

त्यामुळे या संपूर्ण परिसरातील व्यवसायावर परिणाम होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत ठेकेदारास विचारणा केली असता ठेकेदार नागरिकांना व नगरसेवकांना उडवाउडवीचे उत्तरे देतो. सदर काम मंजूर असून पालिकेने ठेकेदाराला पत्र देऊन सुध्दा ठेकेदार काम करत नाही. त्यामुळे सदर ठेकेदार समज देऊन ते काम त्वरित मार्गी लावावे अन्यथा नागपूर-बोल्हेगांव येथील नागरिकांना बरोबर घेवून कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ता रोको किंवा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.