वाळूचा ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी लाचेची मागणी; लाच घेताना तलाठीला अटक

522

वाळूचा ट्रॅक्टरवर कारवाई न करता सोडून देण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज सकाळी ताहराबाद (ता. राहुरी) तलाठी कार्यालयासमोर करण्यात आली. अशोक रामचंद्र थोरात (वय 49, रा. तनपुरेवाडी, ता. राहुरी) असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तलाठी थोरात याने तक्रारदाराच्या मालकीचा ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना रविवारी पहाटे पकडला होता. सदर ट्रॅक्टरवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी थोरात याने तक्रारदाराकडे 50 हजार रूपये लाचेची मागणी करून त्यातील 40 हजाराची रक्कम रविवारीच स्वीकारली. आज सकाळी उर्वरीत 10 हजाराची रक्कम ताहराबाद तलाठी कार्यालयासमोर स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने थोरात यास रंगेहाथ पकडले. उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शाम पवरे, प्रशांत जाधव, विजय गंगूल, हरून शेख, राधा खेमनर, संध्या म्हस्के आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या