
>> नागेश शेवाळकर
आज राम नवमी. म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म दिवस. मध्यान्ह काळी त्यांचा जन्म झाला. पुत्र जन्माचा आनंद वेगळाच असतो. त्यात हे तर साक्षात प्रभू श्रीराम. त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या जन्म समयीचे वर्णन साहित्यात होणारच. अनेकांनी ते अत्यंत सोज्वळ आणि सुंदर शब्दांत केले आहे.
चैत्र महिन्यातील नवमी! दुपारची वेळ! माथ्यावर आलेला सूर्य अचानक थांबलाय. सूर्याचे थांबणे, तेही भर दुपारी म्हणजे सगळे संपलेच. हे तर साऱया जगाचे, साऱया सृष्टीचे, सजीवांचे व्यवहार थांबल्याप्रमाणे. असे घडले तरी काय की, भास्कराने थांबावे? पहिल्या ओळीतील स्वतःच्याच प्रश्नाला उत्तर देताना सखी म्हणते, सखे राम जन्मलाय. अयोध्या नगरीची महाराणी काwसल्यादेवी प्रसूत झाली असून तिच्या पोटी एक तेजस्वी, देदीप्यमान असा पुत्र जन्मला आहे. या सुकुमार अशा दशरथसुताला पाहण्यासाठी सूर्य थांबलाय याचा अर्थ या भूतलावरील सारे जण औत्सुक्यापोटी आपापले व्यवहार थांबवून अयोध्येच्या राजकुमाराचे स्वागत करीत आहेत.
डॉ. ना. गो. नांदापूरकर हे रामजन्म समयीचे वर्णन अत्यंत सोज्वळ शब्दांत करतात.
‘उगवले नारायेन। जशी सोनियाची काया ।
कौसल्येच्या पोटी जन्मले रामराया ।।4।।
कसे दिसत होते नुकतेच जन्मलेले रामराया? उगवतीला आलेले सूर्यदेव जणू सोन्यासारखी पिवळी काया घेऊन जन्मले आहेत. त्यामुळे बाल राम मनमोहक, तेजस्वी असे दिसत आहेत.
काwसल्या दशरथ राजाची महाराणी. श्रीविष्णूच्या सातव्या अवतारातील माता. तिला मुलगा झाला. काय असेल तिची मनोदशा? अनेक वर्षांपासून वाट पाहत असलेला क्षण प्रत्यक्षात आल्यानंतर काय असतील त्या मातेच्या भावना? गदिमा त्या क्षणाचे सुंदर वर्णन करतात,
‘कौसल्या राणी हळू उघडी लोचने
दिपून जाय माय स्वतः पुत्रदर्शने
ओघळले आसू, सुखे पंठ दाटला।।’
पुत्र झाल्याचे समजताच काwसल्येने हलकेच डोळे उघडून शेजारी पहुडलेल्या गोंडस बालकाकडे पाहिले. आपल्या पुत्राच्या पहिल्याच दर्शनाने ती माता हरखून गेली. तिचे डोळे दिपले. आनंदातिशयाने तिच्या डोळ्यांतून आसवे ओघळली. तिला अवर्णनीय असे सुख लाभले की, पंठ दाटून आल्यामुळे तिला बोलताच आले नाही.
श्रीधरस्वामी लिखित ‘श्रीराम विजय’ या ग्रंथात आणि संत तुलसीदास यांनी लिहिलेल्या ‘तुलसी रामायणा’त एक कथा अशी आहे. प्रसूत होताच काwसल्या देवीने आपल्या पुत्राकडे पाहिले तर समोर प्रत्यक्ष लक्ष्मीपती विष्णू तिला दिसले. श्रीविष्णूच्या रूपाचे वर्णन दोन्ही कवींनी अत्यंत मधुर अशा शब्दांत केले आहे. त्यांच्या आपादमस्तक आभूषणांचे, वस्त्रांचे वर्णन केलेले आहे. तसेच यावेळी माता काwसल्या आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये झालेला संवादही अत्यंत श्रवणीय असाच आहे. त्याप्रमाणे भगवान विष्णू काwसल्येला म्हणाले, ‘‘हे माते, पूर्वजन्मातील तुझ्या इच्छेनुसार, मागितलेल्या वरानुसार मी तुझे मूल म्हणून आलो आहे.’’
काwसल्या म्हणाली, ‘‘मी आपल्या रूपाने पुत्र मागितला होता, पण आपण पित्याच्या रूपात आला आहात. हे रूप सोडून मुलाच्या रूपात येऊन बाललीला कराव्यात. ते सुख माझ्यासाठी परमसुख असेल.’’
काwसल्येची इच्छा ऐकून भगवंत विष्णू बाळाच्या रूपात प्रकट झाले. ते पाहून माता काwसल्येचा आनंद गगनात मावत नव्हता.
काwसल्येला पुत्र झाला, राजा दशरथाचा वारस अवतरला ही बातमी अयोध्या नगरीत पसरली. सर्वत्र आनंद झाला. शरयूला भरती आली. पशुपक्षी-लतावेली…सर्वांना अत्यानंद झाला. घरोघरी सडासंमार्जन करून गुढय़ा उभारल्या. घराला तोरणे बांधली. नगारे, ढोल, ताशे वाजवून नौबती झडल्या. घराघरांतून मंगलमय सूर ऐकू येऊ लागले. घरातील लहानमोठय़ा वाद्यांचा गजर सुरू झाला.
गदिमा नागरिकांना झालेल्या आनंदाचे वर्णन ‘राम जन्मला गं सखी…’ या गीतामध्ये अत्यंत भावरम्य शब्दांत करतात,
‘पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या,
काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या’
साधारणतः दुपारच्या प्रहरी कोणतीही कळी फुलत नाही, उमलत नाही, परंतु कवीला वाटते, या आनंददायी घटनेमुळे उन्हामुळे पेंगुळलेल्या कळ्या जणू पुन्हा उमललेल्या आहेत आणि ‘काय झाले, काय झाले?’ असे विचारत आहेत. रामजन्माचा आनंद अयोध्यावासीय केवळ हसण्यातूनच व्यक्त करीत आहेत, त्यांना शब्द फुटत नाहीत.
नागरिकांनी फुलांची उधळण केली. लोक रस्त्यावर येऊन नाचगाणी करण्यात दंग झाले. नगरीतील महिला नटूनथटून, डोक्यावर मंगल कलश घेऊन राजवाडय़ाकडे निघाल्या. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. दशरथ राजाने दानधर्म करायला सुरुवात केली. अयोध्येतील घरोघरी भेटवस्तू पाठविण्यात आल्या.
अयोध्या नगरीत महोत्सव सुरू असताना तिकडे लंका नगरीत वेगळेच काहीतरी घडले.
डॉ. ना. गो. नांदापूरकर लिहितात…
‘अयोध्या नगरीत। रामाचा जन्म झाला।
कळस लंकेचा ढासळला।।’
कदाचित नियतीने रावणाला तसा सावधानतेचा इशारा दिला असावा.





























































