नागपूरच्या बड्या व्यापाऱ्याला मागितली 50 कोटींची खंडणी, माजी लेखापालच निघाला आरोपी

1319
फोटो प्रातिनिधीक

संत्रानगरीतील मोठे व्यापारी ए. के. गांधी यांना एका व्यक्तीने 50 कोटींची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे इतर व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. रामदासपेठ स्वामी अपार्टमेंट येथील रहिवासी फिर्यादी अशोक कुमार रतनलाल (71) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. हा आरोपी अन्य कोणी नाही तर गांधी यांच्या शोरूममध्ये दीड वर्षापूर्वी काम करणारा लेखापाल असल्याचे उघड झाले. आशिष आदेश गोडबोले (29, रा. वैष्णोदेवीनगर, स्वामी नारायण मंदीर मागे, वाठोडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष दीड वर्षापूर्वी धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियम येथील दुचाकी शोरूममध्ये कामावर होता. मॅनेजरसोबत नेहमी वाद होत असल्याच्या कारणाने त्याने नोकरी सोडली होती. यानंतर तो अनेकजागी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अयशस्वी ठरला. त्याच्यावर ओढावलेल्या संकटाला तो ए. के. गांधी जबाबदार मानायचा. लेखापाल असल्याच्या कारणाने त्याच्याजवळ ए. के. गांधी आणि त्यांच्या परिवाराची संपूर्ण माहिती होती. याचाच फायदा घेऊन त्याने त्याच्या संबंधित एका व्यक्तीला फेसबुकच्या माध्यमातून अश्लिल मेसेज आणि फोटो पाठविले. एव्हढेच काय तर गेल्या एका वर्षापासून तो ए. के. गांधीसह परिवारातील सदस्यांना शिविगाळ करून इतर अश्लिल मेसेज पाठवायचा. अशातच आशिषने मर्यादा ओलांडून ए. के. गांधींना 50 कोटींची खंडणी मागितली. त्याने सांगितलेल्या जागेवर जर पैसे दिले नाही तर त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. प्रकरणाला गांभीर्याने घेत फिर्यादीने 11 जूनला धंतोली ठाण्यात तक्रार नोंदविली.

तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारावर कॉल ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अयशस्वी ठरले. या संदर्भात सेल्यूलर कंपनीकडून कॉल हिस्ट्री काढण्यात आली. त्यात असलेल्या पत्त्यावर पोलिसांनी छापा टाकला तरी पोलिसांना खाली हातच परतावे लागले. पोलिसांनी कॉल लिस्टमध्ये सर्वाधिक फोन करण्यात आलेल्या क्रमांकाला शोधून काढले. त्याच्या मदतीने पोलिसांनी आरोपीस अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक देवाजी नरोटे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या