देवाभाऊंच्या ‘गृह’विभागात नागपूर फाईल्स, बारमध्ये ‘सरकारी कारभार’! पेग रिचवत फायली हातावेगळय़ा करतानाचा व्हिडीओ व्हायरल

गुंडगिरी, अत्याचार आणि गुन्हेगारी वाढलेल्या मुख्यमंत्री ‘देवाभाऊं’च्या नागपूरमध्ये अक्षरशः गुह्यांची एक से बढकर एक प्रकरणे समोर येत आहेत. ‘नागपूर फाईल्स’मध्ये आता तर चक्क बीअर बारमध्येच सरकारचा कारभार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून यामध्ये काही अधिकारी दारूचे पेग रिचवताना फाईलवर सह्या करीत असल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नागपूरच्या मनीष नगर भागातील एका प्रसिद्ध बीअर बारमधील हा व्हिडीओ असल्याचे समजते. या बारमध्ये दुपारी 3.30 वाजता अगदी मंद प्रकाशात काही अधिकारी सरकारी फाईल्स हाताळत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. अधिकारी चर्चा करून या फाईल्सवर सह्यादेखील करीत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. विशेष म्हणजे हे ‘सरकारी’ काम करताना अधिकारी दारूदेखील पीत आहेत, मात्र या व्हिडीओतील अधिकारी नेमके कोण, ते कुठल्या फाईली हाताळत होते हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

सीसीटीव्हीमुळे तपासणीत नावे समोर येणार

बारमध्ये जागोजागी सीसीटीव्ही असल्यामुळे या व्हिडीओतील ‘ते’ अधिकारी कोण हे तपासात समोर येणार आहे. मात्र हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे बारमध्ये चालणारा ‘सरकारचा कारभार’ कसा उघड होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.