
उद्घाटनासाठी सज्ज असलेला उड्डाणपूल पावसामुळे खचल्याचा धक्कादायक प्रकार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात घडला आहे. मोठमोठे खड्डे पडलेल्या पुलाचा व्हिडीओ एका नागरिकाने सोशल मीडियावर शेअर केला असून तो व्हायरल होत आहे. त्यामध्ये पुलाचा काही भाग खोलवर खचलेला दिसतोय. यामुळे बांधकामाच्या दर्जाचाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नागपूर शहरातील बांधकामांचा खालावला आहे. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामठी ते न्यू कामठीला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दरम्यान, पावसामुळे गडचिरोलीत 22 रस्ते, 6 तालुक्यांचा संपर्क तुटल्याचे चित्रही दुसरीकडे आहे.
गोंदियात राष्ट्रीय महामार्ग खड्डय़ात
गोंदिया जिह्यातील मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. मासूलकसा घाट परिसरातील पुलाला मोठे भगदाड पडले असून सुरक्षा भिंतदेखील खचली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी या पुलाचे बांधकाम झाले होते. त्यामुळे या पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कंत्राटदारावर कठोर कारवाई करा
या पुलाचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी होत आहे.