
नागपूर ब्रॉडगेज मेट्रो भंडारा शहरापर्यंत सुरू व्हावी अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली होती. या माणीला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद दिल्यामुळे आता नागपूर मेट्रो भंडारा शहरापर्यंत धावण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
या संदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज थेट मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे विशेष बैठक घेतली. या संबंधी जागेची पाहणी करून नियोजन आराखडा (DPR)तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भांडारा व महारेलला देण्यात आले आहेत. नागपूर मेट्रो हा केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त कार्यक्रम असून ही रेल्वे काटोल,नरखेड,वर्धा व भांडरा रोड रेल्वे स्टेशन पर्यंत धावणार होती.
नागपूर मेट्रो भंडारा शहरापर्यंत धावल्यास नागपूरशी दररोज थेट संपर्क करून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भंडारा जिल्ह्याला विकासाची संधी प्राप्त होईल, यासाठी नागपूर मेट्रो भंडारा शहरापर्यंत धावली पाहिजे अशी आग्रही मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मागील वर्षभरापासून लावून धरली होती.
भंडारा शहरात ऑर्डनस फॅक्टरी करिता तयार असलेल्या रेल्वे ट्रॅकवर खात रोडवर रेल्वे स्टेशन तयार व्हावे असे भंडारा शहरातील नागरिकांचे स्वप्न होते,यानिमित्ताने हे स्वप्न पूर्ण होण्याची आशा पल्लवित झाली आहे.
भंडारा रोड रेल्वे स्टेशन शहरापासून 9 किमी अंतरावर असल्यामुळे त्याचा थेट फायदा भंडारावासियांना मिळणार नाही. मात्र ही रेल्वे भंडारा शहरापर्यंत सुरू झाल्यास त्याचा थेट फायदा, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी या सर्व घटकांना होईल ही बाब आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शासनाला अनेकदा बैठकांमधून व पत्रव्यवहाराद्वारे पटवून दिली होती. अखेर त्यांच्या या प्रयत्नाला यश येवून नागपूर मेट्रो भंडारा शहरापर्यंत सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रकल्पाच्या कामाकरिता गरज पडल्यास केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत मी स्वतः बोलणार असे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या बैठकीला सचिव भूषण गगरानी, सचिव पाठक, आमदार नरेंद्र भोंडेकर,जिल्हाधिकारी नागपूर, जिल्हाधिकारी भंडारा, महारेल व मेट्रोचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

























































