नागपूर- मुंबई मोटारसायकल रॅली धडकली आझाद मैदानात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

मातंग समाजाच्या विविध प्रश्‍नांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या नागपूर ते मुंबई मोटारसायकल रॅली 32 जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण करुन मुंबई येथील आझाद मैदानात धडकली. या रॅलीचे रुपांतर आंदोलनात झाले. मातंग समाजबांधवांनी विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी हुंकार भरली. यामध्ये राज्यातील मातंग समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होते.

लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात सदर आंदोलन करण्यात आले. यामध्ये प्रदेश अध्यक्ष सोमनाथ कांबळे, कोअरकमिटी सदस्य कैलास खंदारे, युवराज जाधव, युवकचे प्रदेशाध्यक्ष सचिन क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, अरुण बोरुडे, संतोष शिंदे, सुनिल सकट, परशुराम शिंदे, विलास बोरुडे, संतोष उमाप, नवनाश शिंदे, पोपट फुले, साहेबराव पाचारणे आदींसह संघटनेचे राज्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मातंग समाजाचे विविध प्रश्‍नाचे निवेदन स्विकारुन, येत्या 8 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन प्रश्‍न सोडविणार असल्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे यांनी दिली.

मातंग समाजाच्या विविध प्रश्‍नांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नागपूर ते मुंबई मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. मुंबईला जाताना प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मातंग समाजाचे निवेदन देण्यात आले. या रॅलीचा समारोप मुंबई मध्ये आंदोलनाने झाला. अनुसूचित जातीमध्ये अ,ब,क,ड नुसार वर्गवारी करुन, मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळावे, आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांच्या संगमवाडी (जि.पुणे) येथील समाधीस्थळी स्मारकाचे काम तात्काळ सुरु करावे, राज्य व केंद्र सरकारच्या अनुसूचित जातीकरीता असलेल्या सर्व योजनांची बिहार राज्याप्रमाणे अ,ब,क,ड नुसार वर्गवारी करण्यात यावी, लहुजी वस्ताद यांचा पुतळा संसद व विधान भवन येथे बसविण्यात यावा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ पुर्ववत सुरु करुन पाचशे कोटीचा निधी मंजूर करावा, लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीची शासन दरबारी नोंद करण्याची मागणी लहजू शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.