
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरला सापत्न वागणूक देत आहेत. हा प्रकार थांबविला नाही तर शिवसेनेच्या वतीने नागपूर शहरात तीव्र आंदोलन छेडून एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
शिंदे यांच्या मनमानीविरोधात आज शिवसेना पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे व शिवसेना शहरप्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. दोन वर्षांपासून महापालिकेच्या अग्निशमन दलात फायरमनची भरती झाली नाही. नगर विकास खाते जाणूनबुजून ही रिक्त पदे भरत नाही असा आरोप करीत या जनआक्रोश मोर्चाने महापालिकेत धडक दिली. सुरक्षा व्यवस्था भेदून शिवसैनिकांनी महापालिकेवर धडक दिली. जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद, उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा गगनभेदी घोषणा करीत परिसर दणाणून सोडला. कर्मचारी भरती आणि अडकलेली कामे, बेरोजगारी आणि जनतेला होणारी गैरसोय असे आरोप यावेळी करण्यात आले. शिवसेनेच्या धडक मोर्चामुळे प्रशासन हादरून गेले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत प्रशासनाकडून ठाम आश्वासन देण्यात आले. या मोर्चात महिलाही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.































































