नगरोटातील घुसखोरीवरून हिंदुस्थान आक्रमक, उच्चायोगातील अधिकाऱ्याला कडक शब्दांत ताकीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मूच्या नगरोटा टोलनाक्यापर्यंत दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीवरून हिंदुस्थानने आक्रमक भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी पाकिस्तानी उच्चायोगातील अधिकाऱयाला समन्स बजावला आणि आपल्या देशातील दहशतवादी कट-कारस्थाने थांबवण्याची कडक शब्दांत समज दिली. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबवावे आणि दहशतवादी संघटना उद्ध्वस्त कराव्यात, असे हिंदुस्थानने बजावले.

19 नोव्हेंबरच्या नगरोटा चकमकीमागील पाकिस्तानचा हात उघडकीस आला आहे. त्यामुळे शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायोगातील अधिकाऱयाला हजर राहण्यास सांगितले. नगरोटाच्या चकमकीत जे दहशतवादी मारले गेले, त्यांचा जैश-ए-मोहम्मदशी असलेला संबंध उघडकीस आला आहे.

जैशने 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यासह आणखी काही दहशतवादी कारवाया घडवून आणल्या होत्या. दहशतवाद्यांना जम्मू-कश्मीरातील निवडणूक प्रक्रिया उधळायची होती, हे त्यांच्याकडील शस्त्रास्त्रांवरून स्पष्ट झाले.

दहशतवाद्यांना पाकिस्तानच आश्रय देत आहे. तेथूनच दुसऱया देशांत दहशतवादी कारवाया घडवण्याचे कट रचले जाताहेत हल्ल्याची सूत्रे हलवली जात आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचे हे उद्योग तातडीने बंद करावेत, अशी स्पष्ट ताकिद परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

हल्ल्याच्या कटामागील पाकडय़ांचे कुकर्म

नगरोटा चकमकीत मारले गेलेले चारही दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या सूत्रधाराशी चॅटिंग करीत होते.
सुरक्षा दलांनी जप्त केलेले दहशतवाद्यांचे मोबाईल व त्यातील सिमकार्ड पाकिस्तानचे आहे.
मोबाईलमध्ये दहशतवादी व सूत्रधार यांच्यातील टेक्स मेसेजवरचे चॅटींग आहे. त्यात सूत्रधाराने कधी पोहोचला? काही अडचण नाही ना? अशी विचारणा केली आहे. त्यावर दहशतवाद्याने ‘दोन वाजता’ एवढेच उत्तर दिले आहे.

दहशतवाद्यांना मदत करणारा गाईड कोण?

दहशतवाद्यांना हिंदुस्थान हद्दीत शिरण्यापूर्वी मोबाईल देण्यात आले होते. हिंदुस्थानात घुसल्यानंतर त्यांना एका गाईडने जम्मू-दिल्ली हायवेपर्यंत सोडले. नंतर ते दहशतवादी ट्रकमध्ये बसले होते. तपास यंत्रणा सध्या त्या गाईडचा शोध घेत आहेत.

सांबा जिल्ह्यातील टोल प्लाझावर संशयित ट्रक दहशतवाद्यांचा असल्याचे सुरक्षा दलांच्या लक्षात आले. नंतर जवळपास 35 किलोमीटर दूर अंतरावरील बन टोलनाक्यावर सुरक्षा दलांनी स्फोट घडवून ट्रक उडवून दिला.