
सामना प्रतिनिधी । आष्टी
आष्टी येथील तहसिल कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत असलेला नायब तहसिलदार सुभाष कट्टे याला दोन हजारांची लाच घेताना बीड येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहे. स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणी प्रकारणात ही लाच घेतल्याचे माहिती समोर आली आहे.
आष्टी येथे पुरवठा विभागात काही महिन्यांपूर्वी नायब तहसिलदार पदभार स्विकारलेले सुभाष कट्टे यांना बीडच्या लाचलुचपत विभागाने सोमवार एका रेशन दुकानदाराकडून स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणीबाबत दोन हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान, या बाबत स्वस्त धान्य दुकानदाराने अगोदर लाचचलुचपत विभागास माहिती दिली होती. बीडच्या पथकाने तहसिल कार्यालयात कट्टे यास लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आष्टीच्या तहसिल कार्यालयात छुप्या मार्गाने लाचखोरी करणा-यांच्या झोपा उडाल्या आहेत.
टेकू शिवाय कामे होत नव्हती
टेकू (पैसे) दिल्याशिवाय आष्टी तहसिल कार्यालयात सर्वसामान्याची कामे गेल्या अनेक दिवसापासून होत नाहीत. अनेक बाबतींमध्ये पैसे मागितले जात होते. या कारवाईनंतर आष्टी तहसिल कर्मचारी वठणीवर येतील काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.




























































