वाळूचे टिप्पर सोडण्यासाठी 1 लाखाची लाच, नायब तहसीलदाराला पकडले रंगेहाथ

1325
प्रातिनिधिक फोटो

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टिप्पर सोडण्यासाठी 1 लाख रूपयांची लाच स्वीकारताना गेवराईचे नायब तहसीलदार आणि त्यांचा जोडीदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी गेवराई तहसील परिसरामध्ये करण्यात आली. या कारवाईने गेवराईत खळबळ उडाली आहे.

गेवराई येथील नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे आणि माजीद शेख या दोघांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. अवैध वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर पकडण्यात आला होता. तो सोडण्यासाठी तक्रारदारास 1 लाख रूपयांच्या लाचेची मागणी नायब तहसीलदार यांनी केली होती. तक्रारदाराने याची लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर गेवराईच्या तहसील परिसरात सापळा रचण्यात आला.

बुधवारी नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडेसह माजीद शेख यास एक लाख रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उपाधिक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या