
मुख्यमंत्र्यांकडून वेळ मिळत नसल्यामुळे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे 864 रहिवासी नव्या घराच्या चाव्या कधी मिळणार, याकडे डोळे लावून बसले आहेत.
वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून होत आहे. नायगाव बीडीडी येथील 42 चाळींचा पुनर्विकास करून 3344 रहिवाशांचे पुनर्वसन 23 मजल्यांच्या 20 पुनर्वसन इमारतीमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 8 तर दुसऱया टप्प्यात 12 पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत. पुनर्वसन इमारत क्र. 8 मधील टॉवर क्र. 4 ते 8 या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले असून 864 रहिवाशांना दिवाळीत घरे देण्याचे म्हाडाचे नियोजन होते. भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे दिवाळीचा मुहूर्त हुकला. काही कारणात्सव नोव्हेंबरची तारीख पुढे ढकलली. त्यानंतर पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चावी वाटपाचा कार्यक्रम रखडला. आता फेब्रुवारी संपत आला तरी मुख्यमंत्र्यांकडून चावी वाटपासाठी वेळ मिळालेली नाही.
























































