नालेसफाई पूर्ण! कोरोना लढय़ातही पालिकेचे पावसाळी कामे वेगात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना पालिकेनेही मुंबईतील नालेसफाईचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये मिठी नदीतून यावर्षी तब्बल 80 टक्के तर मोठय़ा नाल्यांमधील 30 टक्क्यांपर्यंत जादा गाळ काढण्यात आला असून मुंबईत यावर्षी जादाचे 107.65 टक्के काम करण्यात आले आहे. शहरात 113.21 टक्के, पूर्व उपनगरात 105.60 टक्के तर पश्चिम उपनगरात 107.51 टक्के कामे करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

कोरोना लढय़ातही पालिकेने पावसाळी कामे वेगाने पूर्ण केली आहेत. मुंबईच्या एकूण 100 टक्के नालेसफाईपैकी 75 टक्के काम पावसाळ्याआधी, 10 टक्के पावसाळ्यात आणि 15 टक्के काम पावसाळ्यानंतर करण्यात येते. यावर्षी एक महिना आधीच म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवडय़ातच नालेसफाईला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधीच मोठय़ा नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण झाले असून छोटे नाल्यांच्या सफाईचे कामही लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

मिठी नदीवर विशेष नजर

मुंबईत अतिवृष्टी असताना समुद्राला भरती असल्यास पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. शिवाय गेल्या काही वर्षांत कमी वेळेत विक्रमी पाऊस होण्याचे प्रकार घडत असल्याने नदी, नाल्याचे पाणी शहरात घुसण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे यावर्षी मिठी नदीच्या सफाईसाठी नदीच्या खोल भागात जाऊन समान पातळीवर गाळ काढण्यासाठी नेदरलँडची टक्शर एम्फिबिअस मशीन तर नदीच्या कानाकोपऱयात जाऊन तरंगता कचऱयाची सफाई करणारी स्विडनची सिल्ट पुशर मशीन वापरण्यात आली.

गाळाच्या वजनावर कंत्राटदाराला पैसे

  • नदी-नाल्यांमधील गाळ कंत्राटदाराच्या माध्यमातून काढण्यात येतो. हा गाळ नदी-नाले पात्राच्या बाहेर काढल्यानंतर सुकवला जातो. या गाळापासून रोगराई पसरू नये यासाठी गाळावर केमिकलचा मारा केला जातो.
  • हा गाळ वाहनात भरण्याआधी, भरल्यानंतर आणि टाकल्यानंतर वाहनाचे फोटो काढले जातात. रिकामे वाहन आणि गाळ भरलेल्या वाहनाचे वजन केले जाते. या सर्व प्रक्रियेवर पालिका प्रशासनाची नजर असते.
  • शहर – 113.21 टक्के काम
  • पूर्व उपनगर – 105.60 टक्के काम
  • पश्चिम उपनगर – 107.51 टक्के काम