खेळाडू ते गृहिणी…

3082

>>नलिनी सुहास फाटक

आयुष्यात छंद, करीयर, संसार, नवरा व मुलं या साऱयांच्या  पलीकडे जाऊन अंतर्मुख होऊन स्वतःचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. माझा जन्म गुजरातमध्ये बडोद्याला झाला. माझे शिक्षण बीए आणि एमए सोशोलॉजीमध्ये झाले. मी स्वतः एक खेळाडू आहे. उदा. बास्केट बॉल, थ्रो बॉल, बॅडमिंटन, रिंग टेनिस. गुजरात राज्यातून मी राष्ट्रीय पातळीवर दोनदा ‘सिलेक्ट’ झाले. मी आयुष्यात खेळात व अभ्यासात चांगली प्रगती केली. माझे माहेरचे कुटुंब खेळाडू आहे.

1969 साली लग्न होऊन फाटक यांच्या घरात मुंबईत गोरेगाव येथे आले. घरची सर्व मंडळी प्रेमळ, सुशिक्षित, शिस्तप्रेमी आहेत.  मला अनेक वेळेला ठाण्यात सांताक्रुझला कोचिंगकरिता बोलाविले गेले होते, परंतु घरून माझ्या जाण्यात नाराजी दिसली. त्यामुळे कुटुंबाला दुखावून काही करायचे नव्हते. त्यात आमचे ‘एकत्र’ कुटुंब. घरात सासूबाई माझ्या बरोबरीने काम करायच्या. त्यामुळे कामे आटपून बराच वेळ मोकळा असायचा. अशावेळी नेमके काय करायचे तर मला पूर्वीपासून शिकविण्याची आवड होती. त्यामुळे आपण मुलांना शिकवायचे असे ठरवले आणि मुलांच्या ‘शिकवण्या’ सुरू केल्या. शिकवणीला सकाळ-संध्याकाळ मुलं यायची. त्यांच्याकडून कमी फी घेऊन शिकविण्याचा आनंद घेत होते. तसेच ‘सामाजिक कार्याची’ आवड असल्यामुळे थोडा वेळ या कामासाठी देत होते. उदा. कोणी आजारी असला तर त्याला भेटायला जाणे, त्यांना वर्तमानपत्र किंवा एखादी पोथी वाचून दाखविणे. त्यांना सूप किंवा खीर करून पोहोचविणे हा माझा छंद आहे. गरजूंना मदत व्हावी या दृष्टीने कॅटरिंगचा व्यवसाय पण आतापर्यंत केला. 1985 सालापासून मी ‘भजनाच्या क्लासला’ जाऊ लागले. प्रसिद्ध गायिका साधना सरगमची आई नीला घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली ‘शास्त्रीय संगीता’च्या आधारावर अनेक भजने शिकली. गेल्या तीस वर्षांपासून आमच्या वास्तूमध्ये यांचा क्लास चालू आहे. अनेक ठिकाणी आम्ही कार्यक्रम केलेत. दूरदर्शनवर पंढरपूर, सोलापूर व पुणे या गावांत पण कार्यक्रम केले. याच्यातून मला भरपूर आनंद, मनःशांती मिळते.  माझे पती, दोन मुलगे, दोन सुना व दोन नाती आहेत. तसेच माझा लहान दीर, जाऊ व पुतणी असे आम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. घरच्या मंडळींचा पाठिंबा व प्रोत्साहन नेहमीच असते. आयुष्यात एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही याचे ‘दुःख’ घेऊन बसू नये. त्यातून नवीन वेगळा मार्ग शोधावा व आपले वेगळेपण सिद्ध करावे.

आपली प्रतिक्रिया द्या