India Olympic Association महाराष्ट्रात अफाट गुणवत्ता पण…

282

मुंबईसह महाराष्ट्रात अफाट गुणवत्ता आहे. पायाभूत सुविधांचीही कमी नाही, पण त्याचा वापर व्यवस्थित व्हायला हवा. या राज्यामध्ये असलेल्या प्रशिक्षण केंद्रात खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱया कोचेसना योग्य मार्गदर्शन करायला हवे. अशा केंद्रांची आर्थिक बाजू भक्कम करणेही यावेळी तितकेच गरजेचे असणार आहे. तसेच ज्युनियर स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडू सीनियर स्तरावर आला की, त्याचे विचार बदलतात. त्याची पावले डॉक्टर, इंजिनीअरसारख्या करीअरकडे वळू लागतात. पालकही यावेळी करीअरकडे डोळा ठेवून क्रीडाकडे दुर्लक्ष करायला सांगतात. हे होऊ नये यासाठी सरकारसह कॉर्पोरेट प्रायव्हेट सेक्टरकडूनही खेळाडूंना नोकऱया देणे गरजेचे आहे. सध्या प्रायव्हेट कंपन्यांनी खेळाडूंना नोकऱयांवर ठेवणे बंद केलेले आहे, असे मत व्यक्त केले आहे हिंदुस्थानी ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांनी. दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी क्रीडाविषयक बाबींवर दृष्टिक्षेप टाकला.

खेळाडूंचे नुकसान

कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आले. या जगातील प्रतिष्ठsच्या क्रीडा महोत्सवासाठी पात्र ठरलेले किंवा पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करीत असलेले बहुतांशी ऍथलीट युवा होते. टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलल्यामुळे या खेळाडूंना सरावासाठी आणखी संधी मिळाली, पण लॉकडाऊनमुळे ऍकॅडमी, ट्रेनिंग सेंटर, जिम बंद असल्यामुळे या खेळाडूंचे नुकसानही झाले, असे नामदेव शिरगावकर यांना वाटते.

आयओएने मार्गदर्शकाचे काम केले

लॉकडाऊनमध्ये खेळाडूंची मानसिकता उत्तम राहावी, फिटनेस चांगला राहावा यासाठी आयओएकडून प्रयत्न करण्यात आले. डेव्हलपमेण्ट प्रोगाम्सबाबत विविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांना सांगण्यात आले. त्यानंतर या संघटनांनी ऑनलाइन सेशनद्वारे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी आयओएकडून मार्गदर्शकाची भूमिका बजावण्यात आली, असे नामदेव
शिरगावकर पुढे म्हणाले.

खेळाडूंच्या आरोग्याकडे लक्ष

सध्या तरी काही देशांकडून आंतरराष्ट्रीय विमान सेवांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकसाठीच्या तयारी व सरावासाठी परदेशात खेळाडूंना ट्रेनिंगला पाठवण्याबाबत आताच काही सांगता येणार नाही, पण आता आमचे प्राधान्य खेळाडूंच्या आरोग्याला देण्यात आले आहे. हेच खेळाडू पुढे जाऊन हिंदुस्थानसाठी खेळणार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात सरावादरम्यान कोणत्याही खेळाडूला काहीही होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे, असे नामदेव शिरगावकर यांनी स्पष्टपणे नमूद केले.

हिंदुस्थानला ऑलिम्पिकमध्ये घवघवीत यश संपादन करण्यासाठी आणखी काळ जाईल, पण आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला काही खेळांमध्ये हमखास पदके मिळू शकतात. नेमबाजी, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग या खेळांमध्ये पदकांची आशा बाळगू शकतात. हॉकीचा संघही चांगला खेळतोय. ऑलिम्पिकमधील गेल्या काही वर्षांमधील निराशा मागे टाकत हिंदुस्थानी संघ पोडियममध्ये उभा राहण्यासाठी उत्सुक असेल. सध्याच्या जागतिक रँकिंगवर नजर टाकल्यास आपल्याला कोणत्या हिंदुस्थानी खेळाडूंकडून पदकांची आशा बाळगता येईल याचा अंदाज बांधता येईल- नामदेव शिरगावकर

युथ ऑलिम्पिक आयोजनाचा विचार करायला हरकत नाही

हिंदुस्थानी ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षांनी 2032 सालामध्ये हिंदुस्थानात ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. यावर नामदेव शिरगावकर म्हणाले, ऑलिम्पिक आयोजनाचा विचार करायला काय हरकत आहे? ऑलिम्पिकचे आयोजन करता आले नाही, तर युथ ऑलिम्पिकचे आयोजन तरी नक्कीच करू. हिंदुस्थानने याआधी मोठी आव्हाने पेलली आहेत, यामध्ये आपण मागे का राहायचे? असा सवाल पुढे त्यांनी केला.

‘त्या’ निर्णयामुळे फायदा होईल

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून ‘एक राज्य एक खेळ’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यावर नामदेव शिरगावकर यांना विचारले असता ते म्हणाले, ही संकल्पना राज्यासह देशाच्या हिताची ठरू शकते. त्यामुळे निवडक राज्यांमध्ये एका खेळासाठी स्पेशल सेंटर उभारण्यात येऊ शकते. याचा फायदा ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये होऊ शकतो. कारण या सेंटरमधील अत्याधुनिक सोयीसुविधांचा फायदा खेळाडूंना घेता येईल. हे खेळाडू पुढे जाऊन देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकून देतील, असा विश्वासही पुढे त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या