नगर जिल्हा विभाजनाचा वाद पुन्हा एकदा उफाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 नगर जिल्हा विभाजनाचा वाद पुन्हा पुन्हा उफाळून येत आहे. भाजपचे खासदार सुजय विखे यांनी जिल्हा विभाजनाच्या संदर्भामध्ये केलेल्या वक्तव्याला शिंदे गटातील खासदार सदाशिव लोखंडे यांनी विरोध केल्यामुळे नव्याने वाद उफाळून आला आहे. विखे यांना विरोध केल्यामुळे आता राजकारण चांगलेच तापणार आहे.

नगर जिह्याचे विभाजन झाले पाहिजे, यासाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. जिल्हा विभाजन करताना दक्षिण जिह्याला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’, तर उत्तर जिह्याचे ‘साईनगरी’ असे नामांतर करावे, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

खासदार लोखंडे म्हणाले, ‘केंद्र सरकारचे छोटे राज्य, छोटे जिल्हे असावेत, असे धोरण आहे. हेच धोरण राज्य सरकारने घ्यावे. एका लोकसभा मतदारसंघाचा एक जिल्हा केला तरी आमचा पाठिंबा राहील. नगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वांत मोठा आहे. प्रशासनातील अधिकाऱयांना काम करताना भौगोलिकदृष्टय़ा अडचणी निर्माण होतात. लोकांना न्याय द्यायचा असेल तर छोटे-छोटे जिल्हे हवेत. मी पूर्वी दक्षिण जिह्यात आमदार होतो, आता उत्तर जिह्यात खासदार आहे. दोन्ही ठिकाणी काम करतानाचा अनुभव लक्षात घेतला तर जिल्हा विभाजन आवश्यक आहे. दक्षिण जिह्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे. तर साईबाबांमुळे शिर्डीचे नाव जगाच्या कानाकोपऱयात गेले आहे. त्यामुळे उत्तर जिह्याचे नाव ‘साईनगरी’ ठेवावे’, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी नगरचे नामांतर करून ‘अहिल्यादेवी नगर’ असे करावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच केली होती. या संदर्भात भाजपाचे खासदार सुजय विखे यांनी, ‘नामांतराऐवजी विकासाला महत्त्व द्या’, असे सांगून ‘बाहेरच्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही’, असे वक्तव्य केले होते. त्यापाठोपाठ पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ‘जिल्हा विभाजनाचा विषय महत्त्वाचा नाही’, असे सांगितले होते.  आता हा विषय थांबत नाही तोच शिंदे गटातील खासदार लोखंडे यांनी आज नवीन वादाचा मुद्दा उपस्थित करत विखे यांना शह देण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता लोखंडे-विखे अंतर्गत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. लोखंडे यांच्याबाबत विखे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.