बारशाला आणलेला सोन्याच्या दागिन्यांचा आहेर चोरटय़ांनी लांबविला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या मुलाचे बारसे धूमधडाक्यात करायचे ठरवून एका हॉटेल व्यावसायिकाने सातारा येथील एका लॉनवर आयोजित केलेल्या बारशाच्या कार्यक्रमात नातेवाईकांनी मुलासाठी आहेर स्वरूपात आणलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा डबा चोरटय़ांनी हातोहात लंपास केला. हे दागिने जवळपास पावणेतीन लाखांचे होते.

हॉटेल व्यावसायिक जयवंत सुरेश टिळेकर (वय 34, रा. किडगाव, ता. सातारा) यांनी त्यांच्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम करंजे (सातारा) येथील महासैनिक भवनच्या लॉनवर आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पै-पाहुणे आणि मित्रांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी आहेर स्वरूपात नातेवाईकांनी विविध प्रकारचे दागिने मुलासाठी भेट दिले, तर कोणी पैसे दिले. हे सर्व दागिने एका डब्यात ठेवले होते. जयवंत टिळेकर यांची आई या डब्याची राखण करीत होती.

बारशाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यांच्या आईला फोटो काढण्याच्या निमित्ताने कोणीतरी बोलावले. त्यामुळे त्या फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या. फोटो काढून परत आल्यानंतर दागिन्यांचा डबा गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरटय़ाने नियोजन करून त्यांना फोटोसाठी बोलावले. त्यानंतर हातचखाली करून दागिने लांबविले. शाहूपुरी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागली नाही.