
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईचे माजी नगरपाल, ज्येष्ठ समाजसेवक ‘पद्मश्री’ नाना चुडासामा यांचे आज सकाळी चर्चगेट येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते कायदेपंडित होते. विविध चॅरिटेबल ट्रस्ट आणि सामाजिक आणि पर्यावरणाशी निगडित अनेक स्वयंसेवी संस्था त्यांनी स्थापन केल्या. भाजपच्या नेत्या आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर शायना एन. सी. यांचे ते वडील होत.
मरीन ड्राइव्हवर एका बॅनरच्या माध्यमातून त्यांनी कित्येक वर्षे मुंबईकरांना अनेक संदेश दिले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींशी निगडित भाष्य आणि संदेश या बॅनरवर प्रसिद्ध केले जात. या संदेशांचे पुढे ‘हिस्ट्री ऑन अ बॅनर’ हे पुस्तक प्रकाशित झाले. रूपा पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले होते. सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना 2005 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 2016 मध्ये चुडासामा यांच्या जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी वेबसाइटही सुरू केली होती. त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दुःख व्यक्त केले आहे.
चुडासामा हे खऱ्या अर्थाने विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मुंबईकरांशी जोडले गेले होते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत चुडासामा यांचा मोलाचा वाटा होता. जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे ते संस्थापक होते. ‘आय लव्ह मुंबई’, ‘फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ऍण्ड एड्स’, ‘नॅशनल किडनी फाऊंडेशन’, ‘कॉमन मेन्स फोरम’ आदी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मुंबईच्या विकासासाठी भरीव योगदान दिले.
























































