भाजपला सत्तेची दिवास्वप्ने; भाजपकडून ब्लॅकमेलिंगचे काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेत्यांना दिवसा सत्तेची स्वप्ने पडत आहेत. पण त्यांचे स्वप्नं पूर्ण होणार नाही. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज व्यक्त केला. सध्या  राजकीय नेत्यांवर बेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरु असल्याचेही ते म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपचा  समाचार घेतला.

देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतक-यांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी बेताल वक्तव्ये आणि बेछूट आरोप, स्टंटबाजी करून भाजप नेते जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत असे ते म्हणाले.

आम्हाला भाजपच्या कुठल्याही इशाऱ्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आमचा कोणताही मंत्री दोषी नसल्याने त्यांच्या आरोपांची काँग्रेसला कसलीही भीती नाही. ईडी आणि सीबीआयचा कशाप्रकारे दुरुपयोग केला जात आहे  हे सारा देश बघत आहे. त्यामुळे कोणीतरी ओरडावे आणि आपण त्याकडे लक्ष द्यावे असे करण्याची काहीच गरज नाही, असे नाना पटोले म्हणाले.