हनीट्रपमध्ये कोण अडकले आहे? नाना पटोलेंचा विधानसभेत सवाल

राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी, मंत्री आणि काही हनीट्रपमध्ये अडकल्याचे कथित वृत्त सध्या चर्चेत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत हा विषय उपस्थित केला. यामुळे राज्यातील गोपनीय कागद या हनीट्रपच्या माध्यमातून समाजविघातक शक्तींकडे जाण्याची शक्यता आहे. यावर विधानसभाध्यक्षांनी शासनाकडून माहिती घेऊन सभागृहाला द्यावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली. त्यावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाने या मागणीची नोंद घ्यावी असे निर्देश दिले.

गेले दोन दिवस हे हनीट्रपचे प्रकरण वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेलवर गाजत आहे. राज्यातील काही वरिष्ठ अधिकारी आणि काही मंत्री या प्रकरणात अडकले असल्याचा गौप्यस्पह्ट एका नेत्याने केला आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी हाच मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.

हनीट्रपच्या माध्यमातून राज्यातील गोपनीय कागद काही लोकांना मिळत आहेत. त्यात राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि काही मंत्री त्यात समाविष्ट आहेत अशी चर्चा सुरू आहे. समाजविघातक शक्तींकडे गोपनीय कागद गेले तर ही गंभीर बाब आहे. काही मंत्रीदेखील हनीट्रपमध्ये अडकल्याचे पटोले म्हणाले.