
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रत्नागिरीत येणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द होऊन ज्या ठिकाणी त्याला विरोध होणार नाही त्या ठिकाणी हा प्रकल्प हलविला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प रायगडात येईल अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. महिन्याभरापूर्वी नाणार प्रकल्प रायगडात येणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्षात हा प्रकल्प रायगडात येणार का याची चर्चा सुरू झाली आहे.
नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत होत होता. या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. यासाठी येथील ग्रामस्थांनी आंदोलन,मोर्चे काढले होते. शिवसेनेनेही स्थानिकांच्या भूमिकेला पाठींबा दिला होता. शिवसेना भाजप यांच्यातील युतीबाबत पत्रकार परिषदेत रत्नागिरीतील नाणार प्रकल्प हा रद्द करून दुसरीकडे हलविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यामुळे हा प्रकल्प आता रायगडात येणार का अशी चर्चा सुरू आहे. रत्नागिरीतील नाणार प्रकल्प रद्द करून रायगडमधील रोहा तालुक्यातील चणेरा भागात येणार असल्याच्या वावड्या महिनाभरापूर्वी उठल्या होत्या. प्रसारमाध्यमांनी याबाबत बातम्याही प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामुळे रोहा तालुक्यासह जिल्ह्यातही याबाबत चर्चेला उधाण आले होते. मात्र, असे काहीही नसल्याचे उघड झाले होते. मात्र, नाणार प्रकल्प रद्द झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याने हा प्रकल्प रायगडात येणार का असा सवाल उपस्थित झाला आहे.
रत्नागिरीमधील नाणार प्रकल्पात जाणाऱ्या जमिनीचा भाव शासनाला परवडणारा नसल्याने हा प्रकल्प रायगडमधील चणेरा भागत येणार असल्याचे बोलले जात आहे. चणेरा भागातील जमिनी खारजमिनी असल्याने त्या पडीक आहेत. त्यामुळे येथील शेतकरी जमिनी देण्यास इच्छुक असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार सध्या सुरू आहेत. तसेच हा भाग मुंबईपासून जवळ असल्याने याचा फायदा कंपनीला होऊ शकतो. त्यामुळे नाणार प्रकल्प हा रायगडात चणेरा भागात होण्यास कोणतीच अडचण शासनाला येणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.




























































