नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरे कारशेडविरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन उभे राहिले होते. या आंदोलनात अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते. नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधी आंदोलनातील हे सर्व गुन्हे मागे घेण्याचे निर्देश अधिकार्‍यांना देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्प गुंडाळावा लागला. भूमिअधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले आश्वासन पाळले आणि तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आदेश देत ही अधिसूचना मागे घेण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. 2 मार्च रोजी प्रकल्प रद्द करण्याची अधिसूचना काढण्यात आली. नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जे आंदोलन उभे राहिले त्या प्रकरणी 23 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी नाणार गुप गामपंचायतीचे सरपंच उल्हास प्रभुदेसाई यांनी निवेदनाद्वारे उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. आज मुख्य सचिवांसह अन्य अधिकार्‍यांसोबत घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पविरोधी आंदोलनात दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याचे निर्देश दिले.

मच्छीमार संघटनांनीही मानले आभार

नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मोठा धोका हा येथील मच्छीमारीला होता. यामुळे या आंदोलनात मोठय़ा प्रमाणावर मच्छीमारही सहभागी झाले होते. आंदोलनातील गुन्हे मागे घेतल्याने मच्छीमार समाजाला दिलासा मिळाला आहे. मच्छीमारही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानीत असल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार संघटनेचे दामोदर तांडेल यांनी सांगितले.

नाणारवासीयांसाठी हा मोठा क्षण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे हा नाणारवासीयांसाठी अधिक मोठा क्षण आहे. उद्धव ठाकरे हे सुरुवातीपासून ते आजतागायत या लढय़ात आमच्या सोबत खंबीरपणे उभे आहे म्हणून आपला अभिमान आहे. नाणार भागाचा दौरा करून लोकांना अभिनंदन आणि कौतुक करण्याची संधी द्यावी, अशी विनंती नाणारवासीयांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.