शिवसेनेने शब्द पाळला, अखेर नाणार रद्द!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

कोकणवासीयांचा विरोध लक्षात घेऊन नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केली. नाणारमधील पाच हजार हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. ही जमीन विनाअधिसूचित (डिनोटीफिकेशन) करण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू झाली असून त्याबाबतचे राजपत्र लवकरच प्रसिद्ध होईल. कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प जनतेवर लादणार नाही, असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारवासीयांना दिला होता. शिवसेनेने दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे.प्रकल्प रद्द झाल्यामुळे अवघ्या कोकणात आनंदोत्सव साजरा झाला.

नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना 2016 मध्ये निघाली होती. ही अधिसूचना रद्द करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते, पण ती विनाअधिसूचित करणे (डिनोटीफिकेशन) करण्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब करणे गरजेचे होते. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाणारची जमीन विनाअधिसूचित करण्याच्या फाइलवर सह्या केल्या अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचे सोपस्कार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पूर्ण होऊन त्याबाबतचे राजपत्र (गॅझेट) लवकर प्रसिद्ध होईल, असे देसाई म्हणाले.

कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा
शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱयावर एमआयडीसीचे शिक्के पडल्यामुळे शेतकऱयांना कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळत नव्हते, योजनाही राबवता येत नव्हती. त्यामुळे राजपत्र प्रसिद्ध झाल्यावर या जमिनी विनाअधिसूचित होतील व त्याचे राजपत्र प्रसिद्ध झाल्यावर शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही ते म्हणाले.

शिवसेनेने शब्द पूर्ण केला
नाणार प्रकल्प रद्द झाल्याने नाणारवासीयांच्या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे असे सांगून सुभाष देसाई पुढे म्हणाले की, सरकारने विधिमंडळात वेळोवेळी जाहीर केले होते की जनतेवर हा प्रकल्प लादणार नाही. तो दिलेला शब्द आज पूर्ण होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन नाणारवासीयांना दिले होते तेसुद्धा आज पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. नाणारच्या प्रक्रियेला पूर्णविराम मिळत आहे असे ते म्हणाले.

कायद्यात सुधारणा करणार
नाणार प्रकल्प रद्द केल्यावर ज्या शेतकऱयांच्या नावावर जमिनी आहेत त्यांच्याकडे जमिनी राहणार आहेत. मधल्या काळात जमीन अधिसूचित झाल्यावर जर कोणी व्यवहार केले असतील तर चुकीचे आहे. असे व्यवहार होऊ नयेत त्यासाठी कायद्यात सुधारणा सुचविणार आहोत. एकदा अधिसूचना निघाल्यावर त्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ नयेत अशी कायद्यात सुधारणा करणार आहोत. शेतकऱ्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे व शासनाने चांगला भाव दिल्यावर त्यात चांगला फायदा कमवायचा असे प्रकार सुरू असतील तर त्या गैरप्रकारांना कायद्यात सुधारणा केल्यावर आळा बसू शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नाणारवासीय रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांचे आभार मानणार
आम्ही जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तुमचा विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन आम्हाला दिले होते. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सागवे येथे येऊन प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती. आज प्रकल्प रद्द झाला. त्याबद्दल आम्ही शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो असे आंबा बागायदार अरविंद सामंत यांनी सांगितले. सर्व ग्रामस्थ उद्या रविवारी रत्नागिरीत येऊन शिवसेना पक्षप्रमुखांचे आभार मानणार असल्याचेही सामंत म्हणाले. रत्नागिरीत उद्या शिवसेनेने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळय़ासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी अकरा वाजता प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे उपस्थित राहणार आहेत.

लोकांना हवा असेल त्या ठिकाणी
नाणार प्रकल्प आता कोणत्या भागात होईल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर उत्तर देताना सुभाष देसाई म्हणाले की, शिवसेना प्रकल्पाच्या विरोधात नाही. ज्या ठिकाणी लोकांना हा प्रकल्प हवा असेल त्या ठिकाणी हा प्रकल्प होईल. विदर्भातून या प्रकल्पाला मागणी आली होती. काटोलचे आमदार आशीष देशमुख यांनी मोहीम सुरू केली होती. एखाद्या ठिकाणची जनता हा प्रकल्प स्वीकारण्यास तयार असेल तर त्या ठिकाणी हा प्रकल्प होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाणारचा राक्षस घालवला, उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
नाणारचा विषारी राक्षस घालवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.
कोकणातील जनतेच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा हा विजय असून सरकारला लोकभावनेचा आदर करावाच लगला, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘शिवसेनेने विकासाला कधीच विरोध केला नाही. नाणारसारखे प्रकल्प निसर्ग, पर्यावरण, शेती, फळबागांचा विध्वंस करतील व त्या विरोधात कोकणची जनता उभी राहिली. शिवसेनेने कोकणी जनतेला साथ दिली. नाणार प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात इतरत्र कुठेही न्यावा. प्रकल्पाला विरोध असण्याचे कारण नाही. या प्रकल्पाचे कोणी स्वागत करणार असेल तर आमची काहीच हरकत नाही. पण लोकांचा विरोध असेल तर शिवसेना नक्कीच लोकांबरोबर राहील’, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केला.