
सामना प्रतिनिधी । नांदेड
आपल्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या 26 वर्षीय तरुला नांदेडचे पाचवे जिल्हा न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
मुखेड तालुक्यात राहणाऱ्या एका माता-पित्यांनी आपली 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी शिक्षण घेण्यासाठी नांदेडच्या खाजगी वस्तीगृहात राहात होती. बडूर ता.बिलोली येथील या अल्पवयीन बालिकेचा मावसा यादव चांदोबा दावलेकर (26) हा दि.12 फेब्रुवारी 2015 रोजी दुपारी या अल्पवयीन मुलीला घेऊन हैद्राबाद, निजामबाद येथे घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. याबाबतची तक्रार 15 फेब्रुवारी 2015 रोजी त्या बालिकेच्या आईने दिल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या कलम 363 आणि 376, सोबत बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यातील कलमे 3 आणि 4 नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयात याप्रकरणी 9 साक्षिदारांनी आपले जबाब नोंदविले. त्यात न्यायालयासमक्ष आलेल्या पुराव्या आधारे न्यायाधीश वाघमारे यांनी आपल्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करण्यासाठी यादव दावलेकरला दोषी मानले भारतीय दंडविधानातील कलम 363 नुसार 5 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड तसेच पोस्को कायद्यानुसार 10 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.































































